पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा भाड्याने देणे आहे... ज्यांना शनिवारवाडा भाड्याने घ्यावयाचा असेल त्यांनी एजंट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे उपरोधिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले आहे. राज्य शासनाने गड किल्ल्यांवर हॉटेल आणि रिसॉर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरुद्ध राष्ट्रवादीच्यावतीने शनिवारवाड्यासमोर आंदोलन करण्यात आले.
शासनाने वर्ग दोनच्या २५ गड-किल्ल्यांवर हॉटेल व रिसॉर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरुन सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने शनिवारवाड्यासमोर उपरोधिक आंदोलन करीत राज्य शासनाच्या निर्णयचा निषेध करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी महापौर तथा नगरसेवक प्रशांत जगताप, नगरसेवक वनराज आंदेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शासनाच्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.शिवाजी महाराज व मावळ्यांच्या पराक्रमी इतिहासाचा व गड किल्ल्यांचा अवमान करणाºया भाजपा सरकारचा धिक्कार असो..., लग्न, मुंज, बारसं, डोहाळे जेवण, वाढदिवस, साखरपुडा कार्यक्रमासाठी शनिवारवाडा भाड्याने मिळेल. त्यासाठी एजंट असलेल्या मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री आणि पालकमंत्र्यांशी संपर्क साधावा असे फलक हातामध्ये धरुन कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. ====गड-किल्ल्यांवर हॉटेल-सिरॉर्ट करायच्या निर्णय घेतना सरकारला लाज वाटायला हवी होती. मुळातच ज्या किल्ल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, मावळ्यांचे बलिदान आहे त्याची वर्गवारी केली जाते हे दुदैर्वी आहे. कॅबिनेटमध्ये घेतलेला निर्णय लपवून ठेवला गेला याचा अर्थ सरकारच्या मनात काळेबेरे आहे. मुख्यमंत्र्यांनी याविषयी सारवासारव केली असली तरी हा निर्णय घेण्याची दुर्बुध्दी झालीच कशी?- चेतन तुपे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष