पुणे : शहराच्या ऐतिहासिक ठेव्यांपैकी एक असलेल्या शनिवारवाडा परिसराला अक्षरश: अवकळा आली. पालिकेच्या उदासीन कारभारामुळे वाड्याच्या भितींलगत असलेल्या मोकळ्या जागांमध्ये कचरा आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तर, दुसऱ्या बाजूला पदपथ अतिक्रमणांनी व्यापला असून जागोजाग पथारीधारकांनी गर्दी केल्याने शनिवारवाड्याचे ऐतिहासिक सौंदर्य झाकले जात आहे. नैमित्यिक स्वच्छता आणि अतिक्रमण कारवाईकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
मराठेशाहीचे पेशवे असलेल्या बाजीराव पेशव्यांनी बांधलेल्या शनिवारवाड्याची प्रशासनाकडून एकप्रकारे अवहेलना सुरु असल्याचे चित्र आहे. पुण्यामध्ये पर्यटनासाठी तसेच सहलींसाठी आलेल्या पर्यटक, अभ्यासक, विद्यार्थ्यांना शनिवारवाड्याचे आकर्षण असते. वाड्यामधून फिरत असताना खाली पाहिल्यावर चहूबाजूला केवळ घाण, कचरा पडलेला दिसतो. आसपासचे व्यापारी तसेच नागरिक त्यांच्या दुकानांमधील आणि घरातील कचरा या ठिकाणी आणून टाकत आहेत. वाड्याच्या भिंतीपासून काही अंतरावर सुरक्षेकरिता लोखंडी जाळ्या बसविलेल्या आहेत. परंतु, या जाळ्यांना गेट ठेवलेले आहेत. त्यांना कुलूप नाही की कोणत्या स्वरुपाची सुरक्षा आहे.
कचरा टाकण्यासोबतच या ठिकाणी हिरवळीवर बसून मद्यपान तसेच नशा करण्याचे प्रकारही घडत आहेत. यामुळे पादचारी नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. वाड्याच्या पश्चिम आणि दक्षिण दिशेला असलेल्या भिंतीलगत मोठ्या प्रमाणावर कचरा साठला आहे. यामध्ये बंदी असलेले थर्माकोल टाकलेले आहे. पश्चिम बाजूला असलेल्या महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरच्या खोलीला कुलूप नसल्याने आतमध्ये मद्यपी आणि गर्दुल्यांचा वावर वाढला आहे. बाजीराव पेशवे पुतळ्याजवळ विद्युत खांब आणि अन्य राडारोडा पडलेला आहे. त्यामुळे या परिसराचे सौंदर्य लोपले आहे.
====
बेकायदेशीरपणाने दुकाने थाटली
वाड्याच्या पूर्व बाजूला असलेल्या भिंतीलगतच्या पदपथावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. जागोजाग बेकायदेशीरपणाने दुकाने थाटण्यात येत आहेत. भविष्य सांगणाऱ्यांपासून ते मोबाईलच्या अॅक्सेसरीज विकण्यापर्यंतच्या सर्व वस्तू या ठिकाणी मिळत आहेत. पालिकेकडून अधूनमधून केवळ जुजबी कारवाई केली जाते. त्यानंतर, चित्र पुन्हा जैसे थे असेच होते. यामुळे पादचाऱ्यांना नाईलाजास्तव रस्त्यावरुन चालत जावे लागते.
फोटो : तन्मय