लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील शनिवारवाडा ते दत्तमंदिर आणि दत्तमंदिर ते लोकमान्य टिळक पुतळा चौक या दरम्यानचा रस्ता आता ‘मॉडेल रोड’ म्हणून विकसित होणार आहे. गर्दी, दाटीवाटी आणि अतिक्रमणांच्या विळख्यात अडकलेल्या या रस्त्यावरील वाहतूक समस्या दूर करण्यासोबतच या रस्त्याचे सौंदर्य वाढविणार असल्याचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले.
पालिकेच्या प्रभाग क्र. १५ मध्ये येत असलेल्या या रस्त्याच्या विकसनासाठी सन २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची तरतूद केलेली होती. रस्त्याच्या मधोमध अद्ययावत ‘रिफलेक्टर्स’ लावण्यात येणार आहेत. या रस्त्यावर माती मुरूम खोदाई करणे, थर्मोप्लॅस्टिक पेंट, मॅनहोल चेंबर्स रस्त्याच्या समपातळीत बांधणे ही कामे होणार आहेत. मालाची वाहतूक करणे, कर्ब स्टोन, शॉट ब्लास्टेड ब्लॉक बसविण्यात येणार आहेत. आरसीसी पाईप बसविण्यासोबतच रस्त्याचे कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे. या उपाययोजनांमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार असल्याचा दावा रासने यांनी केला आहे.