पुणे: भाजपतर्फे मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर जोरदार आंदोलन सुरू आहे. त्याचे पडसाद पुण्यात देखील पाहायला मिळाले. भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती परिसरात एकत्र येत शंखनाद आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी देशासाठी, धर्मासाठी.. भाजप.. भाजप, बोल बजरंगबली की जय, मंदिरांना बंदी, मदिरा विक्रीला संधी अजब हे सरकार, उघड दार उद्धवा, उघड दार उद्धवागणपती बाप्पा मोरया... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बुद्धी द्या! यासारख्या घोषणा देत भाजपने पुण्यात आंदोलन केले.
महाराष्ट्रभर भाजपचे मंदिर उघडण्यासाठी आंदोलन सुरू आहे. आज पुण्यातही आंदोलन झालं. या शंखनाद आंदोलनावेळी कसबा मंदिर उघडण्यात आलं. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुक्ता टिळक, सरचिटणीस दीपक पोटे उपस्थित होते.
मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या बंदोबस्तालाही आव्हान देत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या आंदोलनात भाजप महिला कार्यकर्त्यांही मोठ्या संख्येने सहभाग झाल्या होत्या. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त होता.
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे मंदिर प्रवेश करतानाही पोलिसांची तारांबळ उडाली. भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्कीचा प्रकार घडला. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर चंद्रकांत पाटील, महापौर, मुळीक यांनी गणपतीची आरती केली.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले,भाजपकडून मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे आता या बहिऱ्या सरकारला ऐकू येईल ही अपेक्षा आहे. मंदिर उघडी करा, नियम ठरवा, निवडक संख्येत लोकांना मंदिराच्या आत सोडावे. नियमांचं पालन भाविकांनी केलं पाहिजे. अण्णा हजारे निर्भीड व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केली तर आम्हीही त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ असेही पाटील यांनी सांगितले.
महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, सर्वात आधी कोरोना पुण्यात आला. पुण्यातच लॉकडाऊन सर्वात आधी लावलं गेलं आहे आणि सर्वात शेवटी लॉकडाऊन उठवलं गेलं आहे. याचा अर्थ पुणेकरांनी आतापर्यंत संयम दाखवला. जनजीवन आता सुरळीत झालेलं आहे . सगळी दुकानं, बाजारं खुली झाली. दारूची दुकानं सुरू केलीत पण मंदिरं सुरू करायला राज्य सरकारला अडचण काय येते आहे हे समजायला तयार नाही.