महोत्सव ॲानलाइन सुरू असून, आज दुसरा दिवस आहे. यामध्ये राम नदी काठी राहणारे ॲड. नितीन कोकाटे यांनी देखील लहानपणीच्या स्वच्छ नदीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर शाश्वत विकासासाठी कार्य करणारे आणि सिंबायोसिसमधील प्रा. गुरुदास नुलकर यांनी पाषाण तलावाशेजारील जैवविविधतेबाबत माहिती दिली.
सबनीस म्हणाल्या, ‘‘काही वर्षांपूर्वी राम नदीची अवस्था प्रचंड घाण होती. आता हळूहळू ती सुधारत आहे. मी काही वर्षांपूर्वी नदीकाठी जाऊन काम सुरू केले. येथील कचरा, प्लास्टिक उचलले. दोन ट्रक प्लास्टिक येथे होते. त्यानंतर काही लोक सोबत आले. राम नदी पुनरुज्जीवन प्रकल्प सुरू झाल्यावर तर स्वच्छतेच्या कामाला वेग आला. पूर्वी राम नदीच्या काठी खूप घाण वास येत असे. तो वास आता स्वच्छतेमुळे कमी झाल्याचे लोकच सांगत आहेत.’’
कोकाटे म्हणाले, ‘‘मी लहानपणापासून या नदीकाठी राहत आहे. नदी परिसरात अनेक ओढे होते. त्यात आम्ही पोहायचो. याचाच अर्थ पूर्वी नदीचे पात्र खूप स्वच्छ होते. काही ठिकाणी तलाव होते ते नाहीसे झाले, त्यात खूप गाळ साठला. पाषाण तलावामध्ये खूप मासे असायचे, ते आम्ही हाताने देखील पकडायचो. पण आता ते दृश्य दिसत नाही. नागरीकरण जसे वाढले, तसे येथे लोकं कचरा टाकू लागले. त्यामुळे राम नदीचे स्वरूप बदलले. आता पुन्हा तिला स्वच्छतेसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.’’
प्रदूषित पाण्यातील पक्षी वाढताहेत
नुलकर म्हणाले, ‘‘पाषाण तलावात राम नदीचे पाणी येते. काही वर्षांपूर्वी या तलावात ६९ विविध प्रजातींचे पक्षी या ठिकाणी दिसायचे. पण आता फक्त ३२ दिसतात. यावरून नदीचे प्रदूषण किती वाढले आहे, ते समजते. जे पक्षी प्रदूषित पाण्यात अधिक दिसतात, त्यांचे प्रमाण मात्र वाढताना दिसत आहे.’’
पाषाण तलावातील
पक्ष्यांची घटती संख्या
१९८२ ६९
१९९३ ६२
२००८ ४६
२००९ ३९
२०१५ ४८
२०१७ ३२