पुणे: शांतीलाल सुरतवाला म्हणजे महाकल्पक माणूस. सतत लाईम लाईट मध्ये कसे रहायचे याचे त्यांचे म्हणून एक वेगळेच तंत्र आहे. बरेच राजकीय लोक चमको म्हणून प्रसिद्ध असतात, शांतीलाल तसे नाहीत. त्यांच्या प्रसिद्धी तंत्रात नेहमीच काहीतरी सामाजिक आशय दडलेला असतो. महापौर असताना त्यांना अनेक कार्यक्रमांमध्ये जावे लागत असते. तिथे शाल श्रीफळ ठरलेले. अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांना याचा प्रश्न पडतो. सुरतवाला यांना तो कधीच पडला नाही. याचे कारण ते कार्यक्रमाहून निघाले की गाडीच्या खिडकीतून बाहेर पहात असत. जाताना कोणी महिला दिसल्या की लगेच गाडी थांबवत. खाली उतरून त्या महिलेजवळ जाऊन नमस्कार करत. मी महापौर म्हणून ओळख देत व लगेचच शाल, हार, श्रीफळ त्या महिलेला देऊन टाकत.
लहान मुलांना ते पालकांबरोबर दिसले की चॉकलेट दे, मधूनच पुण्यातील रस्ते धुवून काढायची योजना जाहीर कर, सारसबागेतील फुलराणीला नवा डबा जोडावा म्हणून आंदोलन करत असलेल्या मुलांना त्यांच्याजवळ आईस्क्रिमची गाडी नेऊन खुश कर असे बरेच काही शांतीलाल करत व प्रसिद्धीच्या झोतात येत. त्यांनी कसबा विधानसभेतून आमदारकीची निवडणुकही लढवली होती. एकदा नव्हे तर दोन वेळा. एकदा काँग्रेसकडून तर दुसऱ्या वेळी समाजवादी काँग्रेसकडून. दोन्ही वेळा ते पराभूत झाले, मात्र विजयी उमेदवाराला मिळाली नव्हती इतकी प्रसिद्धी त्यांना प्रचारकाळात मिळाली.
प्रचारफेरीत ते बरीच मजा करत. त्यात मिश्किली असायची. त्यांच्याच परिसरातून एकदा त्यांची प्रचारफेरी जात होती. स्वत: शांतीलाल फेरीत अग्रभागी होते. सर्वांना अभिवादन करत होते. मध्येच ते एका दुकानात घुसले. ते होते सलुन, दुकानात गर्दी होती. शांतीलाल आले म्हटल्यावर तिथे गडबड उडाली. दुकानदार स्वत: स्वागतासाठी पुढे आला. शांतीलाल यांनी त्यांच्या हातातून वस्तरा घेतला व ते सरळ खुर्चीवर बसलेल्या ग्राहकाची दाढी करू लागले. सलुनमध्ये दुसऱ्याची दाढी करणाऱ्या शांतीलाल सुरतवाला यांची ही छबी टिपण्याची संधी कोणताही छायाचित्रकार कशी सोडेल? तीच ही छबी. ती पाहिल्यावर स्वत: शांतीलाल म्हणतात, प्रचारात काय काय करावे लागेल काहीच सांगता येत नाही, पण अशी दुसऱ्याची दाढी करणारा उमेदवार मात्र मागे कधी झाला नसेल, पुढेही कधी होणार नाही.