Sharad Pawar: महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत लवकरच होणार निर्णय; शरद पवारांनी सांगितली रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 01:01 PM2024-09-23T13:01:30+5:302024-09-23T13:01:39+5:30

तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असून पक्षश्रेष्ठींच्या वतीने इच्छुकांचा अभ्यास सुरू

Sharad Pawar A decision will be made soon regarding seat allocation of Mahavikas Aghadi; Sharad Pawar told the strategy | Sharad Pawar: महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत लवकरच होणार निर्णय; शरद पवारांनी सांगितली रणनीती

Sharad Pawar: महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत लवकरच होणार निर्णय; शरद पवारांनी सांगितली रणनीती

बारामती : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने इच्छुकांचा अभ्यास सुरू आहे. पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील आणि वरिष्ठांची टीम मुलाखती घेतील. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. तीन पक्ष राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना हे एकत्र निवडणूक लढणार आहेत. ते एकत्र येऊन निर्णय घेतील. या तीन पक्षांतील एखादी जागा कुठल्या पक्षाने लढवावी, यासंबंधीचा विचार एकवाक्यतेने करावा लागेल. सध्या ती प्रक्रिया चालू आहे. येत्या ८ ते १० दिवसांत महाविकास आघाडीचे जागावाटप बैठक घेऊन पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीची राजकीय रणनीती उलगडली.

बारामती येथे गाेविंदबाग निवासस्थानी पवार यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांची भूमिका मांडली. याबाबतची महाविकास आघाडीची बैठक झालेली नाही. त्यापूर्वी माझ्यासारख्याने मत व्यक्त करणे योग्य नाही. सध्या कुठेही गेले, तरी निवडणूक लढवणारे इच्छुक येऊन भेटत आहेत. आमची आघाडी आहे, आम्ही एकत्र निवडणूक लढणार आहोत. शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यावरही प्रतिक्रिया दिली आहे. केजरीवाल अतिशय उत्तम काम करत होते. त्यांची टीम ही चांगली होती. एका विशिष्ट स्थितीमुळे त्यांना तुरुंगामध्ये टाकले गेले. त्यांच्यावरती खोट्या केसेस केल्या गेल्या. सध्या मराठा व धनगर आरक्षणासंबंधी संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण ढवळून निघाले आहे. याबाबत पत्रकारांच्या प्रश्नावर ज्येष्ठ नेते पवार म्हणाले की, असे प्रश्न सामंजस्याने सोडवायचे असतात. तणाव वाढण्याचे काही कारण नाही. आपण सर्व जात, धर्म काही असले, तरी आपण भारतीय आहोत, महाराष्ट्राचे घटक आहोत. आपल्या सर्वांमध्ये सामंजस्य कसे करता येईल. यासंबंधीची भूमिका या क्षेत्राचे नेतृत्व करतात त्यांनी घेतली पाहिजे. राज्य सरकारने सुद्धा अशा प्रश्नांना संबंधी लोकांना विश्वासात घेऊन त्याची पूर्तता कशी करता येईल, वातावरण चांगले कसे राहिल, याकडे लक्ष देऊन याची खबरदारी घेण्याची गरज पवार यांनी व्यक्त केली.

Web Title: Sharad Pawar A decision will be made soon regarding seat allocation of Mahavikas Aghadi; Sharad Pawar told the strategy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.