महाविद्यालयीन जीवनात शरद पवार यांनी दोन वेळा केल्या नाटकात भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 04:44 PM2023-08-18T16:44:08+5:302023-08-18T16:46:11+5:30
हे राज्यातील पहिले आणि दुर्मिळ तैलचित्र पाहण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी कलादालनाला भेट देली...
बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविद्यालयीन जीवनात दोन वेळा नाटकात भूमिका केल्या. त्या भूमिकांची आठवण बारामती येथील नटराज कलादालनाने तैलचित्रांच्या स्वरूपात जपली आहे. हे राज्यातील पहिले आणि दुर्मिळ तैलचित्र पाहण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी कलादालनाला भेट देली.
नटराज नाट्यकला मंडळाचे प्रमुख किरण गुजर यांनी याबाबत माहिती दिली. गुजर म्हणाले, तैलचित्र पाहण्याची इच्छा सुळे यांनी व्यक्त केली होती. ते पाहण्यासाठी त्यांनी आज भेट दिली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाविद्यालयीन जीवनात बी.एम.सी.सी. कॉलेजमध्ये १९५८ साली गॅदरिंगमध्ये नाटिका केली होती. घडले बिघडले या नाटकात ही छोटी भूमिका केली होती. तसेच बारामती येथे रिमांड होम विभागाच्या १९६१ मध्ये स्थानिक कलाकारांसमवेतदेखील नाटक आयोजित करण्यात आले होते. यामध्ये आचार्य अत्रे यांच्या ‘वंदे भारतम’ यात कल्याण या नेतृत्व करणाऱ्या युवा कलाकाराची भूमिका केली. ही दोन्ही तैलचित्र आपल्याकडे असावीत यासाठी १९९५ पासून प्रयत्न होता. त्यापैकी पहिले तैलचित्र १२ डिसेंबर २०२२ मध्ये नटराजमध्ये लावण्यात आले आहे. तर कॉलेजमधील भूमिकेचे तैलचित्र बनविण्याचे पुण्यात काम सुरू आहे. ते लवकरच या कलादालनात लावले जाणार असल्याचे गुजर म्हणाले.
कलादालनाबाबत सुळे यांना गुजर यांनी माहिती दिली. गुजर म्हणाले, या दालनात कालची, आजची आणि उद्याची बारामती कलादालनात साकारण्यात येणार आहे. तसेच कलादालनाच्या माध्यमातून नागरिकांना तीन शतकातील स्थित्यंतरे पाहता येणार आहेत. पहिल्या भागात शंभर वर्षापूर्वीच्या बारामतीची छायाचित्रे, पेंटिंग्जच्या माध्यमातून ओळख करून दिली जाणार आहे. दुसऱ्या भागात बारामतीच्या विकासाच्या टप्प्यांचा प्रामुख्याने समावेश असेल. तिसऱ्या टप्प्यात भविष्यातील बारामती दाखविली जाईल. त्यालगतच खासदार निधीतून ओपन थिएटर उभारण्यात येत असल्याचे गुजर म्हणाले.
काशिविश्वेश्वर मंदिरातील श्रीधर स्वामींचे कालचक्र आहे, त्यातील नमूद बाबींसह त्याचे मराठीत भाषांतराचे काम सुरू असून ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. तालुक्यातील विविध गावांत वीरगळ आढळल्या आहेत. तसेच तालुक्यातील विविध गावांमध्ये आढळलेल्या शिलालेखांच्या प्रतिकृती येथे उभारण्यात येतील. बारामतीचे त्या काळी असणाऱ्या नाण्याचे संदर्भ इंग्लंड येथील पुस्तकात मिळाले आहेत. त्या नाण्यांच्या प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात येणार आहेत. इंग्लंडमध्ये वास्तव्यास असणाऱ्या पुतणे करण गुजर यांच्याकडून याबाबत माहिती मिळाल्याचे गुजर यांनी नमूद केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, अभिजित जाधव, सुधीर पानसरे, शुभम ठोंबरे आदी उपस्थित होते.