Diwali: पाडव्याला शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे नागरिकांना भेटणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 04:23 PM2022-10-25T16:23:00+5:302022-10-25T16:23:34+5:30
दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी गोविंद बागेमध्ये या तीनही नेत्यांना पाडवा शुभेच्छा देण्यासाठी राज्यातून नागरिक येतात
बारामती : दोन वर्षांच्या कालखंडानंतर यंदा ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे निवासस्थान ‘गोविंदबाग’ पुन्हा फुलणार आहे. दिवाळी पाडव्याच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे बुधवारी (दि.२६) सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत गोविंदबाग येथे नागरिकांना भेटणार आहेत.
कोविडच्या संकटांमध्ये पाडवा शुभेच्छांसाठी गोविंदबाग फुललीच नव्हती. यंदा कोविडचे संकट दूर झालेले असल्याने सकाळी आठ वाजल्यापासूनच हे तीनही नेते नागरिकांना भेटणार आहेत. दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी गोविंद बागेमध्ये या तीनही नेत्यांना पाडवा शुभेच्छा देण्यासाठी राज्यातून लोक येत असतात. यामध्ये आमदार, खासदार, मंत्र्यांसह विविध अधिकारी, पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचा समावेश असतो. यावेळी आपल्या आवडत्या नेत्याबरोबर सेल्फी, छायाचित्र काढण्याची संधीदेखील नागरिकांना मिळते.
तसेच बुधवारी सायंकाळी पाच वाजता श्री महावीर भवन येथे ज्येष्ठ नेते पवार व्यापाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. आगामी वर्ष कसे असेल, या वर्षामध्ये काय उलाढाली होतील, पीक पाणी कसे असेल, तसेच बाजारपेठेची स्थिती कशी असेल, आंतरराष्ट्रीय बाजार कसा असेल, याबाबतच्या आगामी आर्थिक नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन शरद पवार व्यापाऱ्यांना करतात. त्यामुळे व्यापाऱ्यांना देखील या त्यांच्या मार्गदर्शनाची उत्सुकता असते.