शरद पवार-अजित पवार गुफ्तगू, उद्योजकाकडे ४ तास गुप्त बैठक; चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2023 06:18 AM2023-08-13T06:18:06+5:302023-08-13T06:19:21+5:30
दोघांच्या गाड्या एकाच बंगल्यात गेल्या अन् नंतर बाहेरही आल्या
लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व राष्ट्रवादीमधून बाहेर गेलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील उद्योजक अतुल चोरडिया यांच्या घरी गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. दोघेही शनिवारी दिवसभर पुण्यात होते. त्यामुळे या चर्चेला पुष्टी मिळत होती. जयंत पाटील हेही यावेळी उपस्थित असल्याचे समजते.
हॉटेल व्यवसायात असलेल्या या उद्योजकाचे कोरेगाव पार्कमध्ये घर आहे. तिथे ही भेट झाल्याची चर्चा आहे. विविध कार्यक्रम संपल्यानंतर दुपारी शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील हे या ठिकाणी वेगवेगळ्या गाड्यांमधून आले. त्याची चित्रफीत वाहिन्यांवर दाखवण्यास सुरुवात झाली. हे सगळे नेते तेथे तब्बल चार तास होते. त्यामुळेच सगळीकडे चर्चेचे पेव फुटले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व स्थानिक नेत्यांचे मोबाइल स्विच ऑफ झाले. संबंधित उद्योजकानेही मोबाइल बंद ठेवला होता. चर्चेचा तपशील माहिती नाही. मात्र, काही नेत्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.
शरद पवारांनी तो राजीनामा रोखला
फुटीनंतर अजित पवार गटात गेलेले दिलीप वळसे-पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा राजीनामा देण्यापासून त्यांना शरद पवार यांनीच रोखले. वळसे-पाटील यांनीच याबाबतचा गौप्यस्फोट केला.
वळसे पाटलांना टाळले
पुण्यात शनिवारी बरेच कार्यक्रम होते. त्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील (व्हीएसआय) एका बैठकीला शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील हेही या बैठकीला उपस्थित राहणार होते. प्रत्यक्षात मात्र शरद पवार व दिलीप वळसे हेच उपस्थित होते. मात्र, त्यांच्यात कसलाही संवाद झाला नाही. वळसे यांना टाळूनच शरद पवार पुढे गेले, असे निर्दशनास आल्याचे बैठकीतील काही जणांनी लोकमतला सांगितले.