राजू इनामदार
पुणे : राज्यातील दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातून मतदारसंवाद यात्रा काढणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad Pawar) पक्षाकडून ‘शिवस्वराज’ तर राष्ट्रवादी काँग्रेस (Ajit Pawar) पक्षाकडून ‘जनसन्मान’ यात्रा निघणार आहे. राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये व प्रमुख शहरांमध्ये यात्रा फिरणार असून सभा, प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या बैठका असा धडाकेबाज कार्यक्रम आखण्यात आला आहे.
शिवस्वराज यात्रेचे नेतृत्व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) व खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) करणार आहेत. जुन्नरमधून ९ ऑगस्टला यात्रेच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात होईल. त्यानंतर १७ ऑगस्ट व पुढे याच पद्धतीने ऑगस्टअखेरपर्यंत यात्रा जारी राहील. सातारा येथे यात्रेचा समारोप करण्याचे प्रस्तावित असून तिथे ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित राहणार आहेत. खासदार सुप्रिया सुळेही यात्रेत सहभागी होणार आहेत. प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये यात्रेदरम्यान जाहीर सभेचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार) गटाच्या प्रदेश कार्यालयाकडून देण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या यात्रेचे स्वत: नेतृत्व करणार आहेत. त्याशिवाय प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे(Sunil Tatkare), खासदार प्रफुल्ल पटेल(Praful Patel), सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) व पक्षाचे अन्य ज्येष्ठ तसेच युवा पदाधिकारी यात्रेत असतील. जनसन्मान असे या यात्रेचे नामकरण करण्यात आले आहे. या यात्रेतही मोठ्या शहरांमध्ये, जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून अजित पवार यांनी राज्यात सुरू केलेल्या महिला सबलीकरण वगैरे योजनांची माहिती यात्रेच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न यात्रेतून करण्यात येणार आहे. नाशिकमधील दिंडोरी येथून ८ ऑगस्टला ( गुरुवार) यात्रेची सुरुवात होत आहे. ही यात्राही वेगवेगळ्या टप्प्यात मार्गक्रमण करणार आहे. त्याचे वेळापत्रक तयार होत आहे, असे प्रदेश शाखेकडून सांगण्यात आले.
लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार बरेच सावध झाले आहेत. तर मिळालेले यश टिकवून ठेवण्याचा शरद पवार गटाचा प्रयत्न आहे. मतदारांबरोबर थेट संवाद याला दोन्ही गटांनी महत्व दिले आहे. प्रत्यक्ष विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच राज्यात सर्वदूर संपर्क साधला जावा, असा उद्देश यात्रेचा दिसतो आहे. शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीत तर अजित पवार यांचा पक्ष महायुतीत आहेत. मात्र आघाडी व युतीतील मित्रपक्षांना बाजूला ठेवत या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे राज्यस्तरीय यात्रेचे आयोजन केले आहे.
यात्रेचे पुण्यातील नियोजन आम्ही केले आहे. जुन्नरनंतर लगेचच यात्रा पुण्यातील हडपसर, खडकवासला तसेच अन्य विधानसभा मतदारसंघांमध्ये फिरणार आहे.- प्रशांत जगताप - शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्टला सकाळी सारसबाग गणेश मंदिरात आरती करून पुणे शहरातील जनसन्मान यात्रेची सुरुवात होईल. आम्ही त्याचे नियोजन केले आहे. शहरातील सर्व मतदारसंघात संपर्क व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे.- दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)