पुणे: भाजपा आणि शिवसेनेतील कटू संबंधामुळे निर्माण झालेल्या राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. पुण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड या दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.पुणे दौऱ्यावर आलेले गडकरी यांनी दुपारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यानंतर पवार आणि गडकरी यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुखही उपस्थित होते. या बैठकीमध्ये पुरंदर विमानतळाला जोडण्यासाठी रेल्वे मार्ग तयार करण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी केल्याचे सांगण्यात आले. याशिवाय, आळंदी व देहू येथून जुलैमध्ये सुरु होणाऱ्या वारीच्या मार्गाच्या डागडुजीबद्दल चर्चा करण्यात आली. मात्र, सर्वांना उत्सुकता असलेल्या दोन्ही नेत्यांमधील राजकीय चर्चेचा तपशील माध्यमांना पुरवण्यात आला नाही. राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलने करून टीका करत आहे. मात्र, शरद पवार यांची मोदींशी असलेली जवळीक आणि त्यांच्या राजकारणाची आजवरची पद्धत पाहता वेळ पडलीच तर पवार भाजपाला बाहेरून का होईना, पण पाठिंबा देतील, ही शक्यताही नाकारता येत नाही. कालच पालघर निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा 'एकला चलो रे' हा सूर आळवला होता. त्यामुळे उद्या शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढलाच तर पर्यायी मोर्चेबांधणी म्हणून भाजपाकडून प्रयत्न सुरू झाले असावेत का, अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
शरद पवार आणि नितीन गडकरींच्या गुप्त भेटीने चर्चेला उधाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 01, 2018 6:53 PM
गडकरी आणि पवारांच्या बंद दाराआडच्या भेटीमुळे चर्चेला उधाण
ठळक मुद्देपुण्यात नितीन गडकरी आणि शरद पवार यांची गुप्त बैठक, चर्चेला उधाण पालखी मार्ग, पुरंदर विमानतळ विषयावर चर्चेची माहिती