बारामती दि. ५ (प्रतिनिधी) : "आज सर्वत्र पाणी,शेती,बेकारीचा प्रश्न आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सत्तेचा वापर होताना दिसून येत नाही.यासाठी वेगळा निकाल हाती घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे देशाला नवीन दिशा देण्याचे काम केले जाईल. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे," असं मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. बारामती येथे आयोजित महाविकास आघाडीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
पवार पुढे म्हणाले, बारामतीची निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण जगाचं लक्ष आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राच्या हिताचाच निकाल होईल. अनेक वर्ष शेवटची सभा मिशनच्या ग्राउंडवर होत असे. मात्र, यंदा राज्यातील सत्ताधाऱ्यांनी ती जागा ताब्यात घेतल्याने आपल्याला ती मिळाली नाही. कोणी जागा अडविली तरी नुकसान होऊ शकत नाही, हे आजच्या सभेतील गर्दीने सिद्ध झाल्याचे पवार म्हणाले.
यावेळी खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,गेले १० महिने खूप रडले. इतके रडले की आता अश्रू येत नाहीत. तुम्हाला पक्ष,महाराष्ट्र,कुटुंबाची किंमत नसेल तर कोणासाठी रडायचे? असा सवाल सुळे यांनी केला.विरोधक मोदी,शाह यांच्यासोबत संबंध चांगले असल्याचे सांगतात. त्यांनी ते सबंध शेतकऱ्यांसाठी वापरावे, असा टोला सुळे यांनी अजित पवार यांना लगावला. त्यांच्या कामात केव्हाच हस्तक्षेप केला नाही. त्यांचा कायम मान राखला. त्या संस्कारी वागण्यासाठी माझ्यावर टीका केली जाते का,असा देखील सवाल सुळे यांनी अजित पवार यांना केला.
खासदार अमोल कोल्हे म्हणाले,आजच्या सभेतील गर्दीने बारामतीकरांच्या मनात, काळजात काय हे दाखवून दिले आहे.
यावेळी माजी मंत्री सुनील केदार,माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी खासदार वंदना चव्हाण, आमदार रोहित पवार, भूषणसिंह राजे होळकर,अंकुश काकडे, विठ्ठल मणियार तसेच प्रतिभा पवार यांच्यासह पवार कुटुंबीय उपस्थित होते. ...१८ वर्ष तुम्ही पालकमंत्री होता
मी बारामतीची लेक आहे.मुलांप्रमाणे मुलींना देखील अधिकार आहेत. आमचे दिवस मोजू नका, १८ वर्ष तुम्ही पालकमंत्री होता, इतर तालुक्यात किती वेळा गेला,असा सवाल सुळे यांनी केला. काहीजण म्हणतात,समोरचे भावुक होतील.शेवटची निवडणूक असल्याचे सांगतिल, रडतील.मात्र, त्यांना माझे सांगणे आहे.शेवटची की काय, तो निर्णय माझा पांडुरंग घेईल. तुमच्यासारखे आमचे बुरसटलेले विचार नाहीत. त्या विचारांच्या आम्ही नादी लागणार नाही. सर्वसामान्य जनता आमच्याबरोबर असेपर्यंत कोणी माइका लाल आमचं काही करु शकणार नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्यावर केली. दरम्यान, आजच्या सभेत शरद पवार यांचा घसा बसल्याने त्यांनी भाषण आटोपते घेतले. पवार यांनी घसा बसल्याचा उल्लेख भाषणात केला. अवघ्या सात मिनिटात पवार यांनी भाषण आटोपते घेतले.