पुणे-
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राला न मिळता गुजरातला गेल्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका होत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सरकारला खडेबोल सुनावले आहेत. "फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला आहे आणि आता तो काही परत येईल अशी शक्यता नाही. त्यामुळे या चर्चा आता बंद करुन नवीन काय करता येईल ते पाहायला हवं. खरंतर आधीच्या सरकारमध्ये उदय सामंत आणि एकनाथ शिंदे मंत्री होते आणि तेच आता आरोप करताहेत. महाराष्ट्राला सक्षम नेतृत्वामुळे गुंतवणूक मिळायची", अशी टीका शरद पवार यांनी केली आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
फॉक्सकॉन प्रकल्प गेल्यामुळे त्यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ हे बोलणं म्हणजे रडणाऱ्या लहान मुलाला मोठा फुगा दाखवण्यासारखं असल्याचं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र नेहमीच प्रथम क्रमांकावर होता. पण फॉक्सकॉनसारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जातो हे खरंच दुर्दैवी आहे, असंही शरद पवार म्हणाले.
यंत्रणा थंड झालीय का?"राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकारचा कारभार अजून मला दिसलेलाच नाही. कारभार पाहता सगळी यंत्रणा थंड झाल्या आहेत का असा प्रश्न मनात येतो. आताही फक्त काय झाडी, काय डोंगर हेच ऐकायला मिळत आहे. महाराष्ट्रावर राज्यकर्त्यांचं लक्ष आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे", असं शरद पवार म्हणाले.
आता दूषणं देणं बंद करा"प्रकल्प गुजरातला गेलाय आता चर्चा करुन काही उपयोग नाही. तरीही पंतप्रधानांनी प्रकल्प महाराष्ट्रात परत आणला तर त्यांचं स्वागत करु. पण आता नवं काय करता येईल ते पाहायला हवं. दोन्ही बाजूंनी दूषणं देणं बंद केलं पाहिजे. मग ते सरकार असो किंवा मग विरोधी पक्ष. सगळ्यांनी महाराष्ट्रात वातावरण कसं सुधारेल हे पाहिलं पाहिजे", असंही शरद पवार म्हणाले.