"चारच महिन्यांत सत्तेत गेले मग त्यावेळी परकीय मुद्दा कुठं गेला होता..." अजित पवार थेटच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 09:43 PM2024-01-25T21:43:20+5:302024-01-25T21:44:27+5:30
अजित पवारांची शरद पवारांवर टीका...
नारायणगाव (पुणे) : परकीय व्यक्ती आपल्या देशाचे पंतप्रधान नसावी म्हणून शरद पवार, पी. ए. संगमा, तारीक अन्वर यांनी वेगळी भूमिका घेतली आणि सन १९९९ काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. चारच महिन्यांत विलासराव देशमुख यांच्यासोबत मंत्रिमंडळात सामील झाले. त्यावेळी परकीय मुद्दा कुठे गेला? सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्ष होत्या, मग त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय त्यावेळी कसा घेतला? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळवंडी (ता. जुन्नर ) येथील शेतकरी मेळाव्यात व्यक्त केला. ममता बनर्जी स्वंतत्र निवडणूक लढविणार, पंजाब मुख्यमंत्री वेगळे लढणार, अशा पद्धतीने देश चालेल का? आघाडीत मोदीविरोधी सक्षम पर्याय आहे का? असा सवाल करून नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले .
दरम्यान, शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, काँग्रेसकडून विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण तर भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री पदाची संधी असताना ती संधी का दिली गेली नाही? छगन भुजबळ, आर. आर. पाटील यांना संधी द्यायला हवी होती, अशी खंतही अजित पवार यांनी व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपळवंडी येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात अजित पवार हे बोलत होते. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, पोपटराव गावडे, प्रदीप वळसे पाटील, यशवंत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघ, सभापती संजय काळे, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, गणपत फुलवडे, भगवान पासलकर, शरद लेंडे, रघुनाथ लेंडे, अशोक घोलप, किशोर दांगट, गुलाब नेहेरकर, भाऊ देवाडे, उज्वला शेवाळे वैष्णवी चतुर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
यांना भाजप का चालत नाही?
अजित पवार पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे सरकार पडताना सगळ्यांनी भाजप सोबत जाण्याचे ठरवले. पवार साहेबांना शिवसेनेत गेलेले चालते पण भाजपसोबत गेलेले का चालत नाही? वरिष्ठांनी निर्णय घेतला तो बरोबर , आम्ही निर्णय घेतला तो बरोबर नाही, असं कसं? असा सवाल अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांना विचारला. राजकारणात हेतू परस्पर आरोप केला जातो. माझ्यावर ७० हजार कोटी रुपये भ्रष्टाचार आरोप केला. १९६० पासून जलसंपदा विभाने ४५ हजार कोटी खर्च केले आणि माझ्या आरोप होतो ७० हजार कोटीचा.