पुणे : मनसे नेते राज ठाकरेंनी माझी मुंबईत भेट घेतली. तसेच ते दिल्लीत साेनिया गांधी यांच्या भेटीला देखील गेले हाेते. ईव्हीएमबाबत त्यांना अनेक आक्षेप आहे.विधानसभा निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा त्यांचा विचार आहे. त्यामुळे अद्याप जागांच्या वाटपासंदर्भात त्यांच्याशी कुठलिही चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पुण्यात आज सकाळी पत्रकार परिषदेचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यावेळी पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केले. मनसेला विधानसभेला साेबत घेणार का ? या प्रश्नाबाबत बाेलताना पवार म्हणाले, मनसे नेते राज ठाकरे मुंबईत भेटले हाेते. त्यांना ईव्हीएमविषयी अनेक आक्षेप आहेत. त्याबाबत त्यांच्या तीव्र भावना आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा त्यांचा विचार आहे. ताे आम्हाला फारसा पटलेला नाही. ईव्हीएमबाबत सर्वच विराेधी पक्षांची नाराजी आहे. एव्हीएमविराेधात येत्या 9 ऑगस्टला क्रांतीदिनी विविध कार्यक्रम हाती घेण्याचा विचार विराेधी पक्ष करत आहेत. मनसेसाेबत अद्याप जागांबाबत कुठलिही चर्चा करण्यात आलेली नाही.
लाेकसभेला राज्यात काॅंग्रेसची केवळ एक जागा निवडून आली तर राष्ट्रवादीला चार जागा जिंकता आल्या. त्यामुळे विधानसभेला राष्ट्रवादीची जागा वाटपासंदर्भात बार्गेनिंग पाॅवर वाढली आहे अशा चर्चा राष्ट्रवादीच्या काही नेत्यांकडून करण्यात येत हाेत्या. त्याला उत्तर देताना पवार म्हणाले. असे काेणी म्हणाल्याचे माझ्या वाचनात आले नाही. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात झालेल्या पहिल्या बैठकीत प्रत्येकी शंभर जागा लढण्यासंदर्भात बाेलणी झाली हाेती. लाेकसभेत राष्ट्रवादीच्या अधिक जागा आल्या म्हणून बार्गेनिंग पाॅवर वाढली असे काेणी म्हणत असेल तर त्याच्याशी मी सहमत नाही.
आघाडी करताना सर्व जागा लढविणार असे म्हणून चालत नाहीवंचितला येत्या विधानसभेच्या निवडणुकीला साेबत घेणार का ? याबाबत बाेलताना पवार म्हणाले. वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या सर्व जागा लढविणार अशी घाेषणा सांगलीमध्ये वंचितच्या नेत्यांकडून करण्यात आल्याचे माझ्या वाचनात आले. परंतु जेव्हा आपण आघाडीचा विचार करताे त्यावेळी सर्व जागा लढवणार असे म्हणने याेग्य नाही.