बारामती (पुणे) :शरद पवार यांचे ८४ वय झाले तरीदेखील त्यांना विधानसभेचा शंभर आकडा गाठता आला नाही. त्यांना कधीही १०० आमदार निवडून आणता आले नाहीत. नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपने १०० च्या पुढे आमदार निवडून आणले, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
सोनगाव येथे भाजपच्या पक्षीय कार्यक्रमानिमित्त शनिवारी (दि. २४) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आले होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी टीका केली. ते पुढे म्हणाले, नरेंद्र मोदी जेव्हा २०२४ साली पंतप्रधान पदाची शपथ घेतील तेव्हा भाजपचे बारामतीसह महाराष्ट्रातील ४५ खासदार निवडून आलेले असतील. मी तोंडच्या वाफा फेकत नाही. हे परिवर्तन होणारच आहे. नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी पाटण्यामध्ये १९ पक्ष एकमेकांचे हात धरून एकत्र आले. २०१९ मध्ये देखील असेच १७ पक्ष एकत्र आले होते. आज दोनने संख्या वाढली आहे. जेवढा नरेंद्र मोदी यांना विरोध वाढेल तेवढ्या प्रमाणात जनता कमळाचे बटन दाबण्यासाठी धावत जाईल, असं बावनकुळे म्हणाले.८५ पैसे बारामती अॅग्रोला पोहचत होते...
६५ वर्ष काँग्रेसने या देशावर सत्ता चालवले. मात्र या ६५ वषार्ची परिभाषा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केली आहे. मी जेव्हा एक रुपया पाठवतो तेव्हा १५ पैसे जनतेपर्यंत पोहोचतात. १५ पैसे बारामतीला पोहोचतात तर उरलेले ८५ पैसे गेले कुठे? हे आम्ही नाही तर राजीव गांधीच म्हणत होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी हे ८५ पैसे बारामती अॅग्रो ला पोहोचतात, असा टोमणा मारला. मात्र मोदींच्या राज्यामध्ये मताच्या रूपामध्ये त्यांनी जे कर्ज घेतले आहे ते व्याजासहित जनतेला विकासाच्या माध्यमातून परत केले जात आहे. आता जर मोदींनी बारामती मध्ये एक रुपया पाठवला तर एकच रुपया बारामती मध्ये येतो, असेही यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
राहूल गांधी यांच्या आदेशाने कर्नाटकमधील धर्मांतर बंदी कायदा रद्द...
परवाच शरद पवार यांनी एक ट्विट केले आहे. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे सरकार आल्यामुळे मला आता मुस्लिम व ख्रिश्चनांची चिंता वाटते. यांचे सरकार गेल्यानंतर यांना मुस्लिम ख्रिचनांची आता चिंता वाटते. धनगर आणि ओबीसी समाजाची चिंता वाटते. सरकारमध्ये होते तेव्हा उद्योगपती आणि व्यापाऱ्यांची चिंता होती. औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर या जिल्ह्यांची नामांतर करणे चूक होते का? मात्र शरद पवार यांनी मी आयुष्यभर छत्रपती संभाजीनगर म्हणणार नाही, औरंगाबादच म्हणेल. मी अहमदनगर म्हणणार अहिल्यानगर म्हणणार नाही, असं म्हणाले हे तुम्हाला मान्य आहे का? कर्नाटकमध्ये पंजाचे सरकार आले. तत्पूर्वी भाजपचे सरकार असताना धर्मांतर बंदी कायदा आणला होता. मात्र राहुल गांधी यांच्या एका आदेशाने त्या सध्याच्या काँग्रेस सरकारने कर्नाटक मधील हा कायदा रद्द केला, असेही यावेळी चंद्रशेखर बावणकुळे म्हणाले.