लोकमत न्यूज नेटवर्क, इंदापूर : येथील एका सहकाऱ्याला खूप संधी दिली. कारखान्याचे अध्यक्ष केले, जिल्हा परिषद अध्यक्ष, पुढे आमदार आणि मंत्रीही केले. पण इंदापुरात आल्यानंतर मला वेगळीच परिस्थिती असल्याचे समजले. लोकांच्या हातात काही फलक आहेत आणि त्या फलकांवर ‘मलिदा गँग’ असा काहीतरी उल्लेख आहे. मी ही ‘मलिदा गँग’ बारामतीला पाहिली होती. पण इथेही तशी काही गँग असल्याचे मला काही अधिकाऱ्यांकडून कळले, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगत नाव न घेता आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर निशाणा साधला.
हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानिमित्त आयोजित सभेत पवार बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते-पाटील आदी उपस्थित होते.
‘मला स्वतःसाठी काही नको; महाराष्ट्र घ्यायचा आहे’
- पवार म्हणाले, हर्षवर्धन पाटील यांनी उशिरा का होईना परंतु पक्षात येण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय फक्त इंदापूर पुरता नाही तर संपूर्ण उसाच्या धंद्याला मदत करणारा व महाराष्ट्राच्या समाजकारणाला शक्ती देणारा निर्णय आहे.
- मला स्वतःसाठी काही मागायचे नाही. मला महाराष्ट्र घ्यायचा आहे. त्याचा चेहरा, सर्वसामान्यांचे जीवनमान बदलायचे आहे.
- त्यासाठी ज्यांच्याकडे कर्तृत्व, अनुभव, प्रशासन असलेल्या लोकांची आवश्यकता आहे. अशांना विधानसभेत पाठवण्याची जबाबदारी तुमची आहे.