"जिथे आमचा देव नाही तिथे नमस्कारही नाही, आम्हीही राजीनामा देतोय" पुणे NCP शहराध्यक्षांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 04:29 PM2023-05-02T16:29:13+5:302023-05-02T16:29:41+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत माहिती दिली.....
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांनी (sharad pawar resign) पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा केली. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझा सांगाती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही निवृत्तीची घोषणा केली. पवारांच्या घोषणेनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. राज्यभरातील कार्यकर्ते, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते शरद पवारांनी त्यांचा निर्णय मागे घ्यावा यासाठी प्रयत्न करत आहेत. पुण्यातील पदाधिकाऱ्यांनीही शरद पवारांच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचेपुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ट्विट करत माहिती दिली.
जगताप ट्विट करत म्हणाले, "कितीही इच्छा झाली तरी किमान भक्तांच्या श्रद्धेसाठी देवाला देवपण सोडता येत नाही, अगदी तसंच पवार साहेबांनीही अध्यक्षपद सोडू नये. साहेबांनी आपली भूमिका न बदलल्यास माझ्यासह पुणे शहर कार्यकारणीतील तमाम सदस्य राजीनामा देत आहोत, जिथे आमचा देव नाही तिथे आमचा नमस्कारही नाही." पुण्यातील राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांनीही शरद पवारांच्या निवृत्तीला विरोध दर्शविला आहे.
आज सकाळी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात शरद पवार म्हणाले, यापुढे मी तीनच वर्ष राजकारणात राहणार आहे. राष्ट्रवादीच्या पुढच्या अध्यक्षपदासाठी नवीन समिती स्थापन करणार आहोत. नवीन समिती अध्यक्षपदाचा निर्णयही लवकर घेण्यात येईल, असंही शरद पवार म्हणाले. यावेळी सभागृहातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. सभागृहात शरद पवार यांच्या घोषणा सुरू होत्या. यावळी बोलताना शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्या.
कितीही इच्छा झाली तरी किमान भक्तांच्या श्रद्धेसाठी देवाला देवपण सोडता येत नाही, अगदी तसंच पवार साहेबांनीही अध्यक्षपद सोडू नये. साहेबांनी आपली भूमिका न बदलल्यास माझ्यासह पुणे शहर कार्यकारणीतील तमाम सदस्य राजीनामा देत आहोत, जिथे आमचा देव नाही तिथे आमचा नमस्कारही नाही. pic.twitter.com/kS4eIaDIn3
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) May 2, 2023
बारामतीतही राष्ट्रवादी काँग्रेस भवनसह शहरात सर्वत्र शांतता पसरल्याचे चित्र पहावयास मिळाले. यावेळी बहुतांश पदाधिकारी धक्क्यातून न सावरल्याने याबाबत प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शविली. पुणे शहरातील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून आंदोलनही केले.