काटेवाडी (बारामती) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मंगळवारी(दि २) राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय जाहिर केला. याबाबत अजुनही चर्चाच सुरु आहेत. अनेकांना हा निर्णय रुचलेला नाही. मात्र,साहेबांच्या मुळ गावी काटेवाडी(ता.बारामती) येथील गावकऱ्यांनी ‘साहेबांचे निर्णय नेहमी योग्यच असतात’ अशा शब्दात त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत.
काटेवाडी येथील युवा प्रगतशील शेतकरी व माजी कार्यकारी संरपच शितल काटे म्हणाल्या कि, पवार साहेबांनी घेतलेला निर्णय ते कधीही भावनेच्या भरात घेत नाहीत. ६३ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत अशा प्रकारचे धक्कादायक निर्णय अनेक वेळा पवार साहेबांनी घेतले. त्यावेळीही अनेक वादळी उठली. मात्र ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. कालांतराने पवार साहेबांनी घेतलेला निर्णय योग्यच होत असल्याचे अनेक वेळा राज्याने अनुभवले आहे. त्यामुळे राजकीय निवृत्तीसारखा महत्त्वाचा निर्णय पवार साहेब सहजासहजी घेणार नाहीत. घेतलेला विचारपूर्वक घेतलेला हा निर्णय वाटतो. अनेक निर्णयाप्रमाणे हा निर्णय योग्य होता, हे कालांतराने आपल्याला अनुभवता येईल. पवार साहेब फक्त अध्यक्ष पदावरूनच बाजूला होतात. मात्र पक्षाचे सर्वेसर्वा किंग मेकर म्हणून पवार साहेबच राहतील, याबाबत तीळमात्र ही शंका नाही. त्यामुळे पवार साहेबांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे
तंटामुक्तीचे अध्यक्ष के टी जाधव म्हणाले, राज्यातील पवार कुटुंब हे राजकारणातील एक मातब्बर घराणे आहे. कोणताही निर्णय असो तो एकत्रितच घेत असतात. पवार साहेबांच्या प्रकृतीचा विचार करून हा निर्णय घेतलेला असावा, वयाच्या व प्रकृती कारणाने त्यांना काही मर्यादा येत असाव्यात. त्यामुळे साहेब पक्ष वाढीसाठी पायाला भिंगरी बांधून फिरणारा सर्वांना सामावून घेणारा निर्णय क्षमता, संघटन, असणाऱ्या योग्य अशाच व्यक्तीची साहेब निवड करतील. यात शंका नाही . कोणताही निर्णय ते विचारपूर्वकच घेत असतात त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा राजकीय अथवा सामाजिक क्षेत्राला कधीही नुकसान झालेले आढळून आले नाही .
सरपंच विद्याधर काटे म्हणाले, साहेबांनी फक्त अध्यक्ष पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतला आहे. ते अध्यक्ष पद योग्य व्यक्तीच्या हातामध्ये देतील ,पक्षावरच त्यांची कमांड राहिल. त्यांच्या मार्गदर्शना खाली पक्ष बांधणी संघटन या साठी ते योग्य व्यक्ती ची निवड करतील.
उपसरपंच श्रीधर घुले म्हणाले, पवार साहेबांनी प्रकृती मुळे हा निर्णय घेतला असावा. त्यांच्या मार्गदर्शना खाली अनेकांनी चांगले काम करून दाखविले आहे. माझ्या मते ते पक्षवाढी मार्गदर्शनाच्या भुमिकेत आपणाला पहावयास मिळतील. पक्ष वाढीसाठी साहेबाना देशात फिरावे लागते. अध्यक्षपदा मुळे व प्रकृती मुळे मर्याद येत होत्या. निश्चितपणे ते योग्य व्यक्तीची निवड करतील.
काटेवाडी सोसायटी चे माजी अध्यक्ष अनिल काटे म्हणाले, साहेबांनी घेतलेला निर्णय ऐकून खरोखरच आम्हाला धक्का बसला आहे. साहेबांनी तो निर्णय मागे घ्यावा. त्यांनी विचारपूर्वक निर्णय घेतला असला तरी तो मात्र आमच्यासाठी धक्का आहे .कारण अजुन तरी त्यांच्या नेतृत्वाची पक्षाला गरज आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोषाध्यक्ष अमोल काटे म्हणाले, साहेबांनी निर्णय घ्यायचा,त्याची आम्ही अंमजबजावणी करतो. साहेब ५५ वर्ष देशाच्या ,राज्याच्या राजकारणात आहेत.त्यांनी हा महत्वाचा निर्णय घेताना काहीतरी विचार निश्चित केला असणार आहे.आम्ही त्या निर्णयाला विरोध करु शकत नाहि.साहेबांनी पुर्वी सांगितले होते, भाकरी फिरविली पाहिजे,तरुण नेतृत्वाला संधी देणे आवश्यक आहे.सामाजिक प्रश्नांच्या निमित्ताने गेल्या चार पाच वर्षात माझा आणि साहेबांचा निकटचा संपर्क आला.अगदी शेतीच्या बांधाची भांडणे,किरकोळ कामे देखील काही लोक साहेबांकडे घेवुन येतात.लोकांनी भावनिक न होता त्यांच्या प्रकृतीचा देखील विचार करणे आवश्यक आहे.तो साहेबांचा निर्णरु आहे,त्यांच्या प्रत्येक निर्णयात काटेवाडीकर बरोबर असल्याचे काटे म्हणाले.
...साहेबांचे सवंगडी ‘त्या’ निर्णयाने अस्वस्थ
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबरोबर १९६७ पासुन कार्यरत असणारे बारामतीचे माजी नगराध्यक्ष, अनेकांत ऐज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना या निर्णयाबाबत अस्वस्थता व्यक्त केली. वाघोलीकर म्हणाले, कुठेतरी थांबले पाहिजे. या दृष्टीकोनातून साहेबांनी हा निर्णय घेतला असावा. मात्र, शरद पवार हाच आमचा पक्ष आहे. ते नसतील तर आमचा पक्ष कोणता,असा सवाल वाघोलीकर यांनी केला आहे. साहेबांचे जनतेवर आणि जनतेच साहेबांवर तेवढेच प्रेम आहे. जनतेच्या रेट्यामुळे साहेबांना विचार करावा लागेल. साहेबांशिवाय राष्ट्रवादी हि कल्पनाच करवत नाही. आज सकाळी देखील साहेबांना त्यांच्या मोबाईलवर, घरच्या फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र,त्यांचा संपर्क होऊ शकला नसल्याचे वाघोलीकर यांनी सांगितले.