पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी यंदा प्रथमच विधानसभा निवडणुकीत समोरासमोर उभी ठाकली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट दोन जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चार जागा लढत आहे. शहरातील वडगावशेरी मतदारसंघ आणि हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे वडगावशेरी आणि हडपसरमध्ये राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे. पर्वती आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची अस्तित्त्वाची लढाई आहे.
वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बापू पठारे उभे आहेत. हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उभे आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम यांच्यात, तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सचिन दोडके यांच्या लढत होणार आहे. वडगाव शेरी मतदार संघातून सुनील टिंगरे २०१९ साली निवडून आले होते. त्याठिकाणी बापू पठारे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार आहेत. बापू पठारे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ३० ते ४० हजारांच्या फरकाने निवडून आले होते. तर २०१४ ला तिसऱ्या नंबरवर राहून पराभूत झाले होते. २०१९ मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही. तेव्हा टिंगरे राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते. वडगाव शेरी या मतदारसंघात राष्ट्रवादीचे मताधिक्य मोठ्या प्रमाणावर असल्याचे मागील निवडणूका बघून लक्षात येते.
हडपसर विधानसभा मतदार संघातून २०१९ च्या निवडणुकीत तुपेंनी राष्ट्रवादीकडून विजय मिळवला होता. तर त्यांच्या समोर आव्हान देणाऱ्या प्रशांत जगतापांनी हडपसरमधून एकदाही निवडणूक लढवली नाही. पण २०१४ च्या निवडणुकीत ४० हजारांच्या आसपास अशा मोठ्या फरकाने तुपेंचा पराभव झाला होता. तेव्हा भाजपकडून योगेश टिळेकर निवडून आले होते. हा मतदार संघ एकाच पक्षाचा न राहिल्याने येत्या विधानसभेत मतदार कोणाला संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
पर्वती विधानसभा मतदार संघातून माधुरी मिसाळ ३ वेळा निवडून आल्या होत्या. त्यांना आव्हान देणाऱ्या अश्विनी कदम या २०१९ च्या निवडणुकीत मिसाळ यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीकडून लढल्या होत्या. त्यावेळी ३० हजारांच्या फरकाने कदम यांचा पराभव झाला होता. पर्वती विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला पर्वतीवर विजय मिळवणे हे आव्हानात्मक असल्याचे दिसत आहे.
खडकवासला विधानसभेतून तर अवघ्या २ हजार मतांनी तापकीर यांनी दोडगे यांचा पराभव केला होता. आता दोघांनाही खडकवासल्यातून जोर लावावा लागणार आहे. याठिकाणी मयुरेश वांजळे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे हि तिरंगी लढत होणार असून खडकवासल्यातील नागरिक कोणाला साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.