‘साहेबां’च्या विरोधानंतर राेहित पवारांनी अपक्ष लढविण्याची तयारी केली होती; अजित पवारांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 12:57 PM2024-04-20T12:57:51+5:302024-04-20T13:11:12+5:30
कन्हेरी येथे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत पवार बोलत होते...
बारामती (पुणे) : २०१७ मध्ये राजेंद्र पवार यांनी जिल्हा परिषदेसाठी रोहित पवार यांना उमेदवारी देण्याची आपल्याकडे मागणी केली. पण ‘साहेबां’नी त्याला विरोध केल्यावर राेहित पवार यांना अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी करण्यात आली. मात्र, आपण साहेबांचे न एकता रोहित पवारांना उमेदवारी दिली. निवडून आल्यावर मलाच साहेबांची बोलणी खावी लागली. त्यानंतर राेहित पवार यांनी हडपसरला विधानसभा लढविण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, तेथील राजकीय गणिते पाहता आपणच कर्जत जामखेडमधून निवडणूक लढविण्यास सुचविल्याचा दावा अजित पवार यांनी यावेळी करीत आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.
कन्हेरी येथे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी युगेंद्र पवार आणि रोहित पवार या दोन्ही पुतण्यांवर निशाणा साधला. यावेळी
पवार म्हणाले, बारामती परिसरातील साखर कारखाने इतरांनीच काढले, शहरातील संस्था फार पुर्वीपासुनच अस्तित्वात होत्या. आप्पासाहेब पवार यांनी दुधधंदा वाढविण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, आमचे चिरंजीव खुशाल सांगतात. ‘ हे सगळं साहेबांनी केलं’. तुमचा जन्म सुध्दा झाला नव्हता आणि तुम्ही धडधडीत खोटं बोलता, सगळं साहेबांनीच केलं, मग ३२ वर्ष आम्ही काय केले, शब्दात अजित पवार यांनी त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्यावर निशाणा साधला.
यावेळी माजी मंत्री विजय शिवतारे, मंगलदास बांदल, वासुदेव काळे, सुरेंद्र जेवरे, अॅड सुधीर पाटसकर आदींची भाषणे झाली. यावेळी सभेसाठी महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थिप होते. १९८९ मध्ये काहीजण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे मला लोकसभा उमेदवारी मिळावी म्हणुन गेले होते.मात्र, ‘साहेबां’नी त्यांना ‘मी जातो काटेवाडीत शेती करायला,त्याला राजकारणात पाठवा,असे सुनावले.त्यानंतर माझ्यासाठी उमेदवार मागायला गेलेली लोक तोंडात मारल्याप्रमाणे माघारी आल्याची आठवण अजित पवार यांनी सांगितली.
घड्याळाच्या प्रचारामुळे निलंबन-
मतदानासाठी माझ्याकडून धमकावले जात असल्याचे काहीजण बोलतात. मात्र, आपण कोणाला मतासाठी धमकावत बसलो असतो तर लोकांना एवढ्या मतांनी निवडून दिले असते का, असा सवाल केला. शारदानगर परिसरात काय चाललेय बघा, एका शिक्षिकेच्या मुलाने घड्याळाचा प्रचार करीत असल्याचे कारण सांगत त्या शारदानगरच्या शिक्षिकेला कामावरुन कमी करण्यात आल्याचा आरोप अजित पवार यांनी केला. काहीजण दिल्लीत आम्ही दोघेच नडतो, असे म्हणतात. पण मतदारसंघाचे काय, मतदारसंघासाठी विश्वास संपादन करुन कामे करावे लागते. नडून चालत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला.