शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
By राजू हिंगे | Published: May 8, 2024 10:16 PM2024-05-08T22:16:34+5:302024-05-08T22:17:47+5:30
विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने खोटे आरोप करून नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातोय, असेही बावनकुळे म्हणाले.
राजू हिंगे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी 'पुलोद'चा प्रयोग केला, त्यानंतर त्यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता, हा त्यांचा इतिहास आहे. तसेच काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी या निवडणुकीत दोन पक्ष संपणार असल्याचे सांगितले आहे, त्यावरून विलीनीकरण होणार हे लक्षात आले असेलच. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचा पराभव स्पष्ट दिसत असल्याने पवार यांना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उमेदवार मुरलीधर मोहोळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे, मनसेचे नेते बाबू वागस्कर, शहराप्रमुख साईनाथ बाबर आदी उपस्थित होते.
बावनकुळे म्हणाले की, निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डमधून मिळालेले पैसे वाटले जात आहेत असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. त्यावर बावनकुळे यांनी टीका करत चव्हाण यांचे हे वक्तव्य अपरिपक्व आहे. बॉन्डमधून मिळालेल्या पैशाचा हिशोब प्राप्तीकर विभागाला द्यावा लागतो. निवडणुकीत पैसे वाटप करण्याचे उद्यान हे काँग्रेसचेच आहे. बारामतीच्या निवडणुकीत पैसे वाटपाचे व्हिडिओ व्हायरल करणे, तक्रारी करणे हा विरोधकांचा नियोजित कट होता अशी टीका बावनकुळे यांनी केली. कांदा निर्यातीवरील निर्बंध उठवले आहेत, याच निर्णयाचे स्वागत आहे. जीवनावश्यक वस्तूंबाबत आचारसंहितेत घेता येतात, त्यामुळे येते आचारसंहिता भंग झालेला नाही. राज ठाकरे हे महायुतीसोबत आल्याने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे दुखावले आहेत. विरोधकांना पराभव समोर दिसत असल्याने खोटे आरोप करून नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो, असे बावनकुळे यांनी सांगितले.