पुणे : राष्ट्रवादीतील फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटात सहभागी झालेले सहकारमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा राजीनामा देऊ नये, यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच रोखले. वळसे-पाटील यांनीच याबाबतचा गौप्यस्फोट केला. ' हा प्रश्न व्यक्तिगत आहे, पण मला काम करायला सांगितले ही गोष्ट खरी आहे,' असे त्यांनी सांगितले. आम्ही शरद पवार यांना सोडून कुठेही गेलेलो नाही, ते आमचे नेते आहेत आणि राहतील, असेही त्यांनी संगितले.
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे आयोजित चर्चासत्राच्या निमित्ताने शरद पवार व वळसे-पाटील पहिल्यांदाच वसंतदादा शुगर इस्टिट्यूटमध्ये एकत्र आले होते. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना वळसे यांनी ही माहिती दिली. वळसे अजित पवार गटात गेल्यानंतर व्हीएसआयचे अध्यक्ष कोण होणार, याकडे अनेकांचे लक्ष होते. त्यानुसार वळसे यांनी राजीनाम्याचा प्रस्तावही दिला होता. मात्र, शरद पवार यांनी तो फेटाळला. याबाबत शनिवारीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत स्पष्ट केले होते. त्यानंतर वळसे यांनीही त्याला दुजोरा दिला. याचवेळी अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. याबाबत ते म्हणाले, “आज कोणतीही बैठक नव्हती. आज चर्चासत्र होते. यासाठी सर्व साखर कारखान्यांचे अध्यक्ष, संचालक व अधिकारी उपस्थित होते. याचवेळी चांदणी चौकातील उड्डाण पुलाचे लोकार्पण असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे उपस्थित होते, तर मी या चर्चासत्राला हजर होतो.” तर अजित पवार हे शरद पवार यांना टाळताहेत का असे विचारल्यावर हा प्रश्न अजित पवार यांनाच विचारा असे सांगत जास्त बोलण्याचे टाळले. ' केंद्राच्या धर्तीवर राज्यातील सहकार कायद्यात बदल करण्यासाठी एक मसुदा तयार केला जात असून, यासंदर्भात शरद पवारांशी चर्चा करणार आहोत,' असेही त्यांनी नमूद केले.
मलिकांना आमच्यामुळे जामीन नाही
तुम्ही सत्तेत आले म्हणून नवाब मालिकांना जामीन मिळाला का, याबाबत ते म्हणाले, “नवाब मलिक बाहेर आले हा एक न्यायालयीन निर्णय आहे. आमच्या भूमिकेमुळे घडले असे म्हणणे चुकीचे आहे. ते कोणासोबत आहेत, याबाबत बोलणे आता अयोग्य आहे. बाहेर सुरू असणाऱ्या चर्चांना काही अर्थ नसतो.” चर्चासत्र पूर्णपणे अराजकीय स्वरूपाचे होते. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने ते आयोजित केले असल्याने कदाचित अजित पवार अनुपस्थित राहिले असावेत,' असे मत माजी मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले.