पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्पूर्वी केतकीविरुद्ध ठाण्यातील कळवा येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी तिला अटक करण्यात आली आहे. केतकीविरुद्ध समाज माध्यमांवर राष्ट्रवादी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी समर्थकांनी केतकीला सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. तर, काहींनी आक्षेपार्ह शब्दात तिच्यावर टिका केली. यावरुन, आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी ट्रोलर्संवर टिका केली आहे.
भूमाता ब्रिग्रेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी केतकीच्या पोस्टवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. केतकीच्या पोस्टमध्ये शरद पवारांचा उल्लेख कुठेही सापडत नाही, केवळ पवार असा उल्लेख आल्याचे तिने म्हटले आहे. तसेच, केतकीविरोधात घाणेरडे ट्रोलिंग करून आपण संस्कारहीन असल्याचं दाखवू नका, असा टोला देसाई यांनी ट्रोलरला लगावला आहे.
आपल्याकडे लोकशाही आहे, प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. केतकीच्या पोस्टमध्ये कुठेही शरद पवारांचा उल्लेख दिसत नाही. त्यामुळे, तिच्या पोस्टमधील पवार हे नाव नक्की शरद पवारांबद्दलच आहे का? कारण पूर्ण नाव दिसत नाही. मात्र, पवारसाहेबांविषयी ते जाणूनबुजून लिहिलं असेल तर ते चुकीचंच आहे, असेही तृप्ती देसाई यांनी म्हटलं आहे. केतकीच्या पोस्टवर आक्षेप असणाऱ्यांनी तिच्यावर कायदेशीर तक्रार करावी. मात्र, तिच्यावर घाणेरडे ट्रोलिंग करुन आपले संस्कार दाखवू नयेत, अशा शब्दात ट्रोलर्संना तृप्ती देसाईंनी सुनावलं आहे.
केतकी चितळेला अंडे फेकून मारहाण
अभिनेत्री केतकी चितळेने समाजमाध्यमावर एक कविता पोस्ट केली आहे. या कवितेच्या माध्यमातून तिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. त्यानंतर, राष्ट्रवादी आक्रमक झाली असून केतकी चितळेला अटक करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी केतकीला अटक केली असून राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्यांनी तिच्या अंगावर अंडे फेकून मारल्याचीही घटना कळंबोली पोलीस ठाण्याच्या बाहेर घडली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही मुंबईतील सभेत एक बाई शरद पवारांवर बोलली, असे म्हणत केतकीच्या भाष्यावरुन नाव न घेता तिला सुनावलं.