नितीन चौधरी
पुणे : दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मराठा समाज आरक्षणावरून पेटलेल्या घटनेचा राजकीय लाभ उठवत आहेत. आंदोलनकर्त्यांना ते भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. शरद पवार यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकारही नाही. आरक्षण घालवणाऱ्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा त्यांनी घ्यायला हवा होता, असा प्रति टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
पुण्यात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जालना जिल्ह्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांना विचारले असता ते म्हणाले, ही घटना दुर्दैवी आहे. राज्य सरकारने घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. या अहवालात नेमके काय असेल ते स्पष्ट होईलच. मात्र, त्यापूर्वी त्यावर भाष्य करणे योग्य होणार नाही. मराठा समाजातील आंदोलनकर्त्यांना शांतता ठेवावी. यापूर्वी मराठा आरक्षण संदर्भात काढण्यात आलेल्या ५८ मोर्चांमध्ये शांतता कायम राहिली होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागासवर्गीय आयोग नेमून सर्वोच्च न्यायालयापर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा जोरकसपणे लढवला. याबाबत त्यांनी सकारात्मक आणि खंबीर भूमिका घेतली होती, म्हणूनच आरक्षण मिळाले होते. मात्र, त्यानंतर महाविकास आघाडीने हे आरक्षण घालविण्याचे काम केले. आता तीच मंडळी राजकारण करत आहेत. महाविकास आघाडीचे नेते नकारात्मक भूमिका घेऊन आंदोलनकर्त्यांना भडकावत आहेत. हा राजकीय श्रेयाचा मुद्दा नाही. आंदोलनकर्त्यांच्या भावनांचा आदर आहे. रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र बंदला सरकारचा विरोध नाही. मात्र, विरोधी पक्षांनी राजकारण थांबवावे.
शरद पवार यांनी जालना येथील घटनेसंदर्भात गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर विखे यांनी पवार यांना, ज्या महाविकास आघाडी सरकारने हे आरक्षण घालविले त्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा राजीनामा का घेतला नाही, असा प्रति सवाल केला. यावेळी विखे यांनी पवार यांच्यावर आंदोलनकर्त्यांना भडकावीत असल्याचा आरोप केला. दुष्काळ सदृश्य परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी पवार आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांना भडकावत आहेत. त्यांनी त्यांना आधार देण्याची गरज आहे. फडणवीस यांचा राजीनामा घेण्याचा त्यांना कुठलाही नैतिक अधिकार नाही. हे आरक्षण घालवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाच राजीनामा त्यांनी का घेतला नाही असा संवाल त्यांनी या वेळी केला. आरक्षण गेल्यानंतर पवार त्यावेळी का गप्प राहिले, सोयीची घटना असल्यास ते बोलतात. जालन्यातील घटनाही त्यांच्यासाठी सोयीची असल्याने ते आता राजकारण करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. पवार यांचा हा पारंपारिक स्वभाव असल्याचे त्यावेळी म्हणाले.मराठा आरक्षणासंदर्भात संसदेच्या येत्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकारने वटहुकूम जारी करावा, अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी केली. त्यावर विखे म्हणाले, हा केंद्र व राज्य सरकारचा प्रश्न असून त्यांनी त्यात नाक खुपसू नये. आरक्षण का गेले याचा खुलासा त्यांनी करावा. ठाकरे यांनी बोलताना तारतम्य बाळगावे. आरक्षणासंदर्भात नेमलेल्या वकिलांची फी तसेच कागदपत्रे देखील तत्कालीन सरकारने पुरवली नाहीत, आरोप वकिलांनीच केला होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीच प्रायश्चित्त करावे.
महाविकास आघाडीचे नेते बोलघेवडे असून त्यांनी प्रश्न सोडविण्याऐवजी पेटवण्याचे काम केले आहे. यातून ते त्यांचे राजकीय हित जोपासत आहे असा आरोपही व्यक्ती यांनी यावेळी केला.