पुणे : सदानंद आणि अशोक मोहोळ हे चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळत होते. पुढे चालून त्यांनी देशाचे नेतृत्व देखील केले असते. मात्र काही कारणास्तव त्यांनी मध्येच क्रिकेट थांबवले. याबाबत जिल्ह्यातील लोकांच्या मनात खंत होती. परंतु जगाच्या क्रिकेट संघटनेचे नेतृत्व करून मी पुणेकरांच्या मनात असलेली खंत दूर केल्याची आठवण केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार यांनी येथे सांगितली.
राजकारणासह समाजकारण, सहकार, आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण आणि कर्तृत्वसंपन्न कार्यशैलीचा ठसा उमटविणारे माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त महाळुंगे बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मीरा अशोक मोहोळ यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, अनंतराव थोपटे, हर्षवर्धन देशमुख, मदन बाफना, माजी आमदार बाळा नांदगावकर आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, पंतगराव कदम,मधुकर मोहोळ,अमृत महोत्सव गौरव समितीचे कार्याध्यक्ष दिलीप बराटे, समितीचे अध्यक्ष नानासाहेब नवले, संग्राम मोहोळ, सदानंद मोहोळ, उल्हास पवार, अॅड. जयदेवराव गायकवाड,वंदना चव्हाण, अंकुश काकडे आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषदाचे अध्यक्ष, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शरद पवार म्हणाले की, पुणे जिल्ह्याच्या नेतृत्वामध्ये ज्या मंडळींची नावे घेतली जातात त्यामध्ये मामासाहेब मोहोळचे नाव कटाक्षाने घ्यावे लागले. यामध्ये मोहोळ यांनी गिरणी कामगार ते राजकारण, समाजकारण, सहकार, शैक्षणिक या सर्व क्षेत्रात त्यांनी काम केले. क्रीडा आणि शिक्षण क्षेत्रात त्यांना अधिक रस होता. अशोक मोहोळ यांना मामासाहेबांप्रमाणेच कुस्ती, क्रिकेट, शैक्षणीक क्षेत्रात रुची दाखवली आणि त्यांच्या कायार्ची छाप त्या त्या क्षेत्रावर पाडली. मामांची कुस्तीबाबतची आस्थेला आण्णांनी ख-या अथार्ने न्याय दिला. सामान्य व्यक्तिला प्रतिष्ठा आणि सन्मान मिळावा म्हणुन मोहोळ कुटुंबिय सतत झटत राहिले. व्यवसाय, शैक्षणिक क्षेत्र, शेती बहुतेक सर्वच क्षेत्रात मामासाहेंबांचा वारसा अशोकआण्णा आणि त्यांची पुढील पिढी नेटाने चालवत आहे.
सत्काराला उत्तर देताना अशोक मोहोळ म्हणाले की, हाती घेतलेले प्रत्येक काम चांगल्या प्रकारे पार पाडल्याचे समाधान आहे. आई वडीलांचे संस्कार,पत्नीची साथ कार्यकर्त्यांची मदत यामुळे माझ्या या जडणघडणी मध्ये सर्वांचा वाट आहे आणि हा सत्कार ही आज चा तुम्हा सवार्चा असल्याचे मानतो. माज्या राजकीय जीवनामध्ये शरद पवार,विदुरा नवले,अनंतराव थोपटे या नेत्यांची मोलाची साथ लाभली.