Sharad Pawar: नव्या जोमाने पक्षबांधणी; शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शरद पवार कराडकडे रवाना
By निलेश राऊत | Published: July 3, 2023 09:18 AM2023-07-03T09:18:51+5:302023-07-03T09:21:36+5:30
मोदीबाग या त्यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली होती...
पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसमधील महाबंडानंतर पुन्हा नव्या जोमाने पक्ष बांधणी करण्याचा निर्धार करून, आपल्या शेकडो कार्यकर्त्यांबरोबर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सोमवारी सकाळी आठ वाजता कराडकडे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती स्थळाकडे दर्शनासाठी रवाना झाले.
मोदीबाग या त्यांच्या निवासस्थानी सोमवारी सकाळी सात वाजल्यापासून शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली होती. सर्वात प्रथम खासदार ऍड. वंदना चव्हाण हे या ठिकाणी आल्या. त्यानंतर पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हे ही याठिकाणी आले. तसेच बीडचे आमदार संदीप शिरसागर, पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, कमल ढोले पाटील, उल्हास ढोले पाटील, माजी नगरसेवक निलेश मगर, उदय महाले, रवींद्र माळवदकर, भगवानराव साळुंके, काका चव्हाण, दीपक जगताप, गणेश नलावडे, आदी प्रमुख पदाधिकारी मोदीबाग येथे दाखल झाले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना ऍड वंदना चव्हाण यांनी, कालची घटना ही खूपच वाईट घडली असल्याच्या भावना व्यक्त केल्या. तर अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांनी आणि खासदारांनी आपलं मन काय म्हणतंय ते ऐकलं पाहिजे. मी स्वत: शरद पवारांसोबत कायम राहणार असून, शरद पवारांसोबत मी पण कराडला जाणार आहे. आजपासून नव्या जोमाने आम्ही शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षबांधणीला सुरुवात करणार आहोत.
आमदार रोहित पवार म्हणाले, अजित पवार भाजप सोबत जातील असे वाटलं नव्हतं, मात्र भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणार हे काहीसं लक्षात आले होते असे सांगितले. आता ही संघर्षाची वेळ आहे. येत्या ५ तारखेला आम्ही सर्व आमदार भेटणार होतो, पण आज राजकारणात येऊन चूक झाली का अशी भावना मनात येत आहे. परंतु, पक्ष फुटला तरी आम्ही लढत रहाणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.