पुणे : राजकारणातील ज्येष्ठ अनुभवी नेते शरद पवार हे कलारसिक देखील असल्याचे आज पुणेकरांना अनुभवायला मिळाले. संगीत नाट्यमहोत्सवाच्या सांगता समारंभाला ते उपस्थित राहिले आणि संगीत नाटकाचा पहिला अंक दोन तास बसून पाहिला. त्यामुळे उपस्थित रसिक देखील त्यांचे कौतूक करत होते. यामधून शरद पवार यांनी आपण देखील अस्सल रसिक असल्याचे दाखवून दिले.
मराठी रंगभूमी, पुणे या संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षारंभानिमित्त गंधर्वभूषण जयराम शिलेदार संगीत नाट्यसेवा ट्रस्ट यांनी संगीत नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले होते. त्याच्या सांगता समारंभाला राष्ट्रवादी कॉग्रेेसचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्यांनी गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत ‘संशयकल्लोळ’ हे नाटक पाहिले.
राजकीय व सामजिक जीवनात वावरत असताना कला क्षेत्रातही पवार यांचे नाव घेतले जाते. कारण या क्षेत्रातही त्यांचे योगदान आहे. सोमवारी सकाळीच पवार बालगंधर्व रंगमंदिर येथे दाखल झाले आणि संगीत नाट्य महोत्सवाच्या सांगता सोहळ्यात सहभागी झाले. सांगता सोहळ्यानंतर पवार लगेच निघून जातील, असेच सर्वांना वाटत होते. परंतु, त्यांनी दोन तास बसून संगीतनाटकाचा आस्वाद घेतला. ‘संशयकल्लोळ’च्या पहिल्या अंकाचा पडदा पडल्यानंतर ते तिथून निघाले.
पवार यांच्याशी बोलण्यासाठी माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणावर बालगंधर्व रंगमंदिराच्या व्हीआयपी रूममध्ये उपस्थित हाेते. परंतु, पवार हे माध्यमांशी न बोलताच तिथून निघून गेले. सांस्कृतिक कार्यक्रमाला राजकीय बोलायचे नसते, हाच नियम जणूकाही त्यांनी प्रत्यक्षात उतरवला.