पुणे : राज्यातील सत्ताकोंडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची उद्या (18 नोव्हेंबर) दिल्लीत बैठक होणार आहे. पुण्यात शरद पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक रविवारी संध्याकाळी पार पडली. या बैठकीत शरद पवार यांच्यासह जयंत पाटील, छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे उपस्थित होते.
या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कोअर कमिटीच्या बैठकीत राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. तसेच, उद्या शरद पवार आणि सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर मंगळवारी राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची चर्चा करुन पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये सरकार स्थापन करण्याबद्दल बैठका पार पडल्या. या तीनही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी एका बैठकीत सत्ता स्थापनेबाबत किमान समान कार्यक्रमाचा अहवाल तयार केला असून हा अहवाल पक्षाच्या प्रमुखांना दिला आहे. मात्र, अद्याप यावर अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे राज्यातील सत्ता स्थापनेबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या उद्याच्या भेटीला अत्यंत महत्त्व आहे. पण, ही भेट झाल्यानंतर राज्यातील सत्ताकोंडी सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.