पुणे : लोकसभा निवडणुक झाल्यानंतर शरद पवारांनी दुष्काळी भागाचा दौरा केला. लोकांची मदत करून त्यांना मन:शांती मिळते. मात्र पंतप्रधान मनाला शांती मिळण्यासाठी केदारनाथ मंदिरात ध्यान करतात. पण त्यांचा व्यक्तिगत विषय आहे, अशा शब्दांत शरद पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी मोदींना टोला लगावला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी संवाद साधला. सृजन फाउंडेशन आणि रोहित पवार मित्र परिवारातर्फे दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभुमीवर गरजु विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. हा उपक्रम सुमारे दोन महिन्यांपासून सुरू आहे. रविवारी आणखी विद्यार्थ्यांना या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले. त्यांच्यासाठी सोमवारपासून मेस सुरू केली जाणार आहे. यावेळी पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. सृजन मारुती अवरगंड, ओम कट्टे, आकाश झांबरे, ऋषिकेश जगदाळे, मुन्ना आरडे, कुणाल गांधी, तुषार गाडे आदी यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, एमपीएससी हेल्पिंग हँड आणि सृजन फाउंडेशनच्या वतीने गणेश कला क्रीडा मंच येथे दि. १८ ते २० जूनदरम्यान स्पर्धा परीक्षा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाºया राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी हे शिबीर खुले असणार आहे.