सत्ता भोगली, मंत्री झाले पण तरीही गुंजवणीचे पाणी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2024 01:12 PM2024-11-18T13:12:29+5:302024-11-18T13:21:14+5:30
सासवड येथील प्रचार सभेत शरद पवारांची नाव न विजय शिवतारेंवर टीका
पुणे : काही जण पाच वर्षे मुंबईत राहतात, निवडणुका आल्या की गावाला येतात. माझे आणि मुख्यमंत्र्यांचे संबंध चांगले आहेत असे सांगून लोकांना भुलावायचे. मुख्यमंत्रीही येतात आणि कौतुक करतात आणि निघून जातात. याला काय अर्थ आहे. गुंजवणी प्रकल्प आम्ही मंजूर केला. ९५ टक्के काम ही पूर्ण केले. पुढे ते दहा वर्षे सत्तेत होते. त्या विभागाचे मंत्री होते. मात्र अजूनही पाणी आले नाही. पुरंदरच्या इतर योजना पुरंदर उपसा जलसिंचन, जानाई शिरसाई योजना, उद्योगवाढीसाठी यांचे योगदान काय? अशी टीका विजय शिवतारे यांचे नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
दरम्यान, आजच्या सभेच्या गर्दीने आघाडीचे उमेदवार संजय जगताप यांचा विजय निश्चित झाला आहे. तरी ही मोठे मताधिक्य मिळवून द्यावे असे आवाहन पवार यांनी केले.
सासवड येथे महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार संजय जगताप यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी शरद पवार बोलत होते. याप्रसंगी आमदार संजय जगताप, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रवक्त्या डाॅ. शामा मोहम्मद, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, प्रचारप्रमुख सुदाम इंगळे, विजय कोलते, शंकरनाना हरपळे, बबुसाहेब माहूरकर, उल्हास शेवाळे, धाडसी मोडक, माणिकराव झेंडे, प्रदीप पोमण, सुनीता कोलते, राहुल गिरमे, ओबीसी सेलचे संजय टिळेकर, सागर जगताप आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले, महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. माझ्याकडे आकडेवारी असून दोन वर्षांत ६७ हजार महिलांवर अत्याचार झाला. ही लहान गोष्ट नाही. बेपत्ता होण्याचीही माहिती असून राज्यात ६४ हजार महिला व मुली बेपत्ता झाल्या आहेत. गृहमंत्री ज्या जिल्ह्यातील आहे, त्या नागपुरातील ही नोंद आहे. एकीकडे लाडकी बहीण म्हणायचे आणि दुसरीकडे स्त्रियांवर अत्याचार होत आहे. महिला गायब होत आहे. त्याचा काही परिणाम होईल ना, अशा शब्दांत शरद पवार यांनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले. शेतकरी आत्महत्या करत आहेत. शैक्षणिक संस्था वाढल्या, पण संधी कुठे आहे, नोकरी नाही, रोजगार नाही असे अनेक प्रश्न आहे. हे प्रश्न मांडणं आमचं काम आहे.
सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. निवडणुका जिंकण्यासाठी ते पाऊल टाकत आहे. त्याचा परिणाम किती होईल हे बघायचं आहे. राज्यात लोकांना परिवर्तन हवंय. लोक परिवर्तन करतील. महाविकास आघाडीच्या बाजूने लोक उभे राहतील, असा विश्वासही शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
विकासकामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न
गेल्या पाच वर्षांत पाण्याचे राजकारण केले नाही. पुरंदर उपसा योजना कार्यक्षमतेने चालविली त्यामुळे उसाचे ५० हजार टनांवरून ७ लाख २५ हजार टनांवर उत्पादन गेले. जलजीवन योजनेचा लाभ तालुक्यातील १०० टक्के गावांना दिला, शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला, शरद कृषी भवन, तलाठी कार्यालय उभी केली. गुंजवणी योजना जुन्या कालव्याप्रमाणेच करण्यासाठी पाठपुरावा केला. रस्त्याचे जाळे निर्माण केले आहे. विरोधक स्वतःचे पुतळे उभे करायचे म्हणत असून केवळ विकास कामांचे श्रेय घेण्याचे प्रयत्न करीत आहेत. संधी असतानाही त्यांना एकही काम पूर्ण करता आले नाही. दुसरे आदर्श उमेदवार माझ्या निष्ठेवर बोट ठेवतात मात्र त्यांनी किती पक्षांचे फाॅर्म भरले, अधिकारी असताना पुरंदर हवेलीतील किती युवकांना रोजगार दिला असा प्रश्न उपस्थित केला. लोकनेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार राहुल गांधी यांचे विचार घेऊन मला पुन्हा प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या असे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले.
संभाजी झेंडे यांना पवारांचे अल्टिमेटम
आमचेच एक सहकारी माजी जिल्हाधिकारी निवडणुकीत उतरले आहे. प्रेक्षकांकडे पाहत शरद पवार यांनी विचारले त्याला आजच्या भाषेत काय म्हणतात, प्रेक्षकांकडून एकच आवाज आला. "गद्दार". यानंतर पुन्हा भाषण सुरू करताना त्यांनी प्रशासकीय काम केले. आम्हाला अभिमान आहे. निवृत्त झाल्यानंतर आपण आमच्याबरोबर आलात. आम्हाला आनंद झाला. समाजात काम करण्यासाठी संधी मागितली. आम्ही ती ही दिली. मात्र विधानसभेला उमेदवारी मागितली. मात्र पुरंदर-हवेलीचा अंदाज घेतला असता गेली पाच वर्षे लोकांच्या संपर्कात असणाऱ्या संजय जगताप यांनाच निवडणुकीत निवडून यायची संधी असल्याचे दिसून आले. आघाडी धर्मानुसार त्यांनाच उमेदवारी देणे हे ही क्रमपात्र होते. शहाण्याने हे समजून घ्यायचे असते. गद्दारीचा शिक्का नको असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. आमचं चुकलं असं जाहीर करा, थांबा आणि संजय जगताप यांना पाठिंबा द्या. सन्मान मिळेल, अन्यथा तुमचे तुम्हीच ठरवा. पुरंदरची जनता अंजिरापेक्षाही गोड आहे, अन्यथा खूप खवट ही आहे अशा शब्दात शरद पवार यांनी संभाजी झेंडे यांचे नाव न घेता अल्टिमेटम दिला.