पुणे: चंद्रकांत पाटलांनी दगड डोक्यावर ठेवला का छातीवर ठेवला हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. यापूर्वी चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, आम्ही मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केले आहे. हा दिल्लीमधून आदेश आला. त्याबद्दल बोलताना पवारांनी भाजपला चिमटे काढले. आज पुण्यात एका कार्यक्रमाप्रसंगी पवारांनी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदेंच्या तत्कालिन सुरक्षेविषयावरही भाष्य केले.
पवार म्हणाले, एकनाथ शिंदे यांना सुरक्षा पुरवण्याबद्दलची वस्तुस्थिती मला माहिती नाही. सुरक्षा कोणाला कशी आणि किती द्यायची हे कॅबिनेट आखत नाही. याबद्दल कॅबिनेटमध्ये चर्चा होत नाही. याबद्दल चर्चा करण्यासाठी मुख्य सचिव, गृहसचिव या वरिष्ठ लोकांची कमिटी असते. आज मी सकाळी राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना भेटलो. त्यांनी मला स्पष्ट सांगितले की एकनाथ शिंदे यांना झेड दर्जाची सुरक्षा होती. तसंच त्यांच्याकडे गडचिरोलीचा पदभार असल्याकारणाने अतिरिक्त फोर्स त्यांना देण्यात आला होता. यामुळे मला असं वाटतं याबद्दल अधिक चर्चा करण्याची गरज नाही, अंसही पवार म्हणाले.
राज्यात नवे राज्य सरकार आले आहे. त्यामधे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्रे फडणवीस यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. राज्यात नवीन सरकार सत्तेवर येऊन चार आठवडे झाले आहेत परंतु अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावर बोलताना पवार म्हणाले, राज्यातील सत्ता या दोघांनी चालवायचं ठरवलेलं दिसतेय. त्यांना राज्यातल्या सहकाऱ्यांची आणि केंद्रातल्या नेतृत्वांची दोघांचीही सहमती आहे. ते सत्ताधारी आहेत त्यामुळे ते जे करतील ते आपल्याला स्वीकारावा लागेल.