पुणे - सध्या निष्ठावान कोणाला म्हणावं हे कळण्यास मार्ग राहिला नाही. आमचं कुठं ही सरकार नसल्याने काही काम नाही, पण सध्या किमान फेरिवाल्याचा मुद्दा मिळाल्याने भारी काम झालं. परंतु सध्या काही पक्षात वेगळ्याच फेरीवाल्याचा विषय असतो, अशी जोरदार फटकेबाजी मनसेचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी केली.
राजकारणासह समाजकारण, सहकार, आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात आपल्या अभ्यासपूर्ण आणि कर्तृत्वसंपन्न कार्यशैलीचा ठसा उमटविणारे माजी खासदार अशोक मोहोळ यांच्या अमृत महोत्सवानिमित्त महाळुंगे बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बाळा नांदगावकर बोलत होते.
यावेळी नांदगावकर म्हणाले की, शरदराव आम्हाला बाळासाहेबांच्या जागी असून, त्यांच्या बद्दल आदर आहे. परंतु शरदरावांच बोट धरून अनेकजण राजकारणात आले. अगदी गुजरातचे लोकपण आले आणि देशाचे पंतप्रधान झाले. पण पवारसाहेब तुम्हाला एक पी (पद्मविभूषण ) मिळाला दुसरा पी (पंतप्रधानपद ) कधी मिळणार असा सवाल देखील उपस्थित केला. त्याच बरोबर तुमचे शिष्य काकडेंच्या वाढदिवसाला मी पुण्यात आलो होतो.व्यासपीठावर संजय काकडे आणि अंकुश काकडे या दोघांकडे पाहत ते पुढे म्हणाले की, संजय काकडे नव्हे तर अंकुश काकडे यांच्या वाढदिवसाला आलो होतो. असं म्हणत त्यांनी खासदार संजय काकडेना टोमणा मारत. राजकारणात पण फेरीवाले असल्याचे सांगत सभागृहात पुन्हा एकदा हशा पिकला.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री गिरीश बापट, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, अनंतराव थोपटे, हर्षवर्धन देशमुख, मदन बाफना, माजी आमदार बाळा नांदगावकर आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार चंदू बोर्डे, पंतगराव कदम,मधुकर मोहोळ,अमृत महोत्सव गौरव समितीचे कार्याध्यक्ष दिलीप बराटे, समितीचे अध्यक्ष नानासाहेब नवले, संग्राम मोहोळ, सदानंद मोहोळ, उल्हास पवार, अॅड. जयदेवराव गायकवाड,वंदना चव्हाण, अंकुश काकडे आजी-माजी खासदार, आमदार, जिल्हा परिषदाचे अध्यक्ष, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.