Baramati Sharad Pawar ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आपला उमेदवार देण्याची तयारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी सुरू केली आहे. त्यादृष्टीने अजित पवारांच्या बारामती शहरात सभा आणि मेळावेही सुरू झाले आहेत. याच मेळाव्यांमध्ये बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्यावर नुकतीच जोरदार टीका केली होती. हे लोक तुम्हाला भावनिक करतील, पण तुम्ही विकासाच्या बाजूने उभे राहा, असं आवाहन त्यांनी केलं होतं. अजित पवारांच्या या टीकेला शरद पवार यांनी आज बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेतून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवारांच्या टीकेला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, "मतदारांना भावनात्मक आवाहन करण्याची आम्हाला आवश्यकता नाही. कारण बारामती लोकसभा मतदारसंघातील लोक आम्हा लोकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. पण ज्या पद्धतीने विरोधकांकडून लोकांसमोर भूमिका मांडली जात आहे, त्यांची भाषणं वेगळंच काहीतरी सुचवत आहेत. या सगळ्याची नोंद बारामतीतील मतदार योग्य पद्धतीने घेतील," असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवारांना आव्हान दिलं आहे.
मला एकटं पाडलं जाईल, अजितदादांचा दावा; शरद पवार काय म्हणाले?
पवार कुटुंबात मला एकटं पाडलं जाईल, त्यामुळे तुम्ही लोकांनी मला साथ दिली पाहिजे, असं आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना काल केलं होतं. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, "कोणत्याही उमेदवाराला निवडणुकीत मतदारांची साथ मागण्याचा अधिकार आहे. मात्र संपूर्ण कुटुंब एका बाजूला आणि कुटुंबात मी एका बाजूला आहे, असं सांगून त्यांच्याकडूनच लोकांना भावनिक करून त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसत आहे," असा हल्लाबोल पवार यांनी केला आहे. तसंच तिकडून आमच्याकडे येणाऱ्या कार्यकर्त्यांना फोन करून दमदाटी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं कार्यकर्ते सांगत आहेत. तसंच तुम्हाला पदं मीच दिली, असं सांगितलं जात आहे. बारामती मतदारसंघात आधी कधीच घडल्या नाहीत, अशा गोष्टी आता घडू लागल्या आहेत, असा आरोपही शरद पवारांनी केला आहे.
पक्ष आणि चिन्हावरूनही साधला निशाणा
राष्ट्रवादीचं अधिकृत नाव आणि चिन्ह अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटाला देण्यात आल्यानंतर शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे. "निवडणूक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय आमच्यावर अन्याय करणारा तर आहेच, पण पदाचा गैरवापर करणाराही आहे. याबाबत आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत आणि निवडणुका जवळ आल्याने लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती आम्ही कोर्टाला करणार आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना आणि उभारणी कोणी केली, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. मात्र असं असतानाही हा निर्णय देण्यात आला आहे. त्यामुळे आमच्यासमोर सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. अजित पवार गटाच्या अनेक नेत्यांनी पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल, असं आधीच मेळाव्यांमधून सांगितलं होतं. तेव्हाच आमच्या लक्षात आलं होतं की, हे सर्व सेटलमेंट करून घेतलेले निर्णय आहेत. त्यामुळे आपल्याला पुढील तयार ठेवायला पाहिजे, असा विचार आम्ही केला होता. त्यानुसार आम्ही आता सुप्रीम कोर्टात गेलो आहोत," असं शरद पवार म्हणाले.