शरद पवारांची निवृत्ती कंटाळा, वैताग नसून अजितदादांना शांत करण्याची खेळी; राजकीय वर्तुळात चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 01:05 PM2023-05-03T13:05:42+5:302023-05-03T13:05:56+5:30
शरद पवारांचा निर्णय वयामुळे, राजकारणाचा कंटाळा आल्याने असेल यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा विश्वास नाही
राजू इनामदार
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदापासून बाजूला होण्याचा, निवृत्त होण्याचा शरद पवार यांचा निर्णय वयामुळे, राजकारणाचा कंटाळा आल्याने असेल यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विश्वास नाही. या दोन्ही गोष्टींवर मात करून पवार राजकारण करत आले आहेत. तरीही पवार यांनी असा निर्णय घेतला याचा धक्का राष्ट्रवादीच्या नव्या-जुन्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बसला आहे. त्यात थोरल्या व धाकट्या, व्हाया सुप्रिया सुळे यांनाही मानणाऱ्यांचा मोठ्या संख्येने समावेश आहे.
पवार कुटुंबातील राजकीय मतभेद आता लपून राहिलेले नाहीत; मात्र तरीही शरद पवार सर्व गोष्टींवर कमांड ठेवून आहेत. अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी केला, तो शरद पवारांना अशा पद्धतीने मोडून काढला की अजित पवार यांना परत येण्याशिवाय दुसरा मार्गच राहिला नाही. आता पुन्हा एकदा तशाच हालचाली सुरू असल्याची चर्चा असतानाच शरद पवार यांनी थेट निवृत्तीचा विचार जाहीरपणे बोलून दाखवला यामागे वय, कंटाळा, वैताग किंवा त्रागा असे काहीही नसून अजित पवारांना शांत करण्याची ही खेळी असल्याचे बोलले जाते.
मात्र, त्यामुळे दोन्ही पवारांना मानणाऱ्या अनेकांची कुचंबणा होत असल्याचे जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांबरोबर बोलताना जाणवले. नाव घेऊन बोलण्याची कोणाचीही शहामत नाही, मात्र अशा पद्धतीचे राजकारण पक्षाची हानी करणारे ठरणार असे त्यांना वाटते. राज्यातील काँग्रेस व शिवसेना असे दोन्ही पक्ष शक्तिहीन झाले आहेत. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यात चांगले राजकीय महत्त्व येईल. त्याचा नीट वापर व्हायला हवा. कुटुंबाच्या या मतभेदांमध्ये पक्षाचे मात्र अहित होईल, असे बऱ्याच पदाधिकाऱ्यांना वाटते. देशात विरोधकांची एकजूट होत असताना अशा पद्धतीने वाद होत राहिले तर तिथे असलेले महत्त्वही टिकणार नाही, असे एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने स्पष्टपणे बोलून दाखवले.
जिल्ह्यात व राज्यातही स्वतंत्रपणे दोघांनाही मानणाऱ्यांची संख्याही बरीच आहे. अजित पवारांची कामाची धडाडी, त्यांचा स्पष्टवक्तेपणा, विरोधकांना थेट आव्हान देण्याची भाषा याचे फॅन असणारे अनेक तरुण कार्यकर्ते आहेत. अजित पवारच पक्षाचे सर्वेसर्वा व्हावेत, असे त्यांना वाटते. त्यांना शरद पवारांविषयी आदर आहे, मात्र त्यांनी आता थांबावे, असेही त्यांना वाटते. त्याचवेळी शरद पवार यांना मानणाऱ्यांचे म्हणणे आहे की, शरद पवार यांची दूरदृष्टी, त्यांचा संयम, त्यांची सामाजिक भूमिका याचा अजित पवारांनी नीट अभ्यास करावा, ते आत्मसात करावे व नंतर नेतृत्वासाठी तयार व्हावे, अशाने त्यांनाच राजकारणात शरद पवार यांच्यासारखी दीर्घ खेळी खेळता येईल, असे काहींचे मत आहे.
यात सुप्रिया सुळे समर्थक मात्र सध्या शांत बसा व पहा या भूमिकेत असल्याचे दिसते. त्यांचे कोण, त्यांना मानणारे कोण हे अद्याप ठळकपणे पुढे आलेले नाही, मात्र तसे राजकीय वातावरण मात्र जरूर आहे. सुळे यांचा जिल्ह्यातील, त्यांच्या बारामती मतदारसंघातील वावर या खास असामींमध्येच होत असतो. तेच सगळे नियोजन करत असतात हे आता हळूहळू पुढे येऊ लागले आहे.
शरद पवारांच्या कृतीतून दोन संदेश
शरद पवार यांनी यातून दोन संदेश दिले आहेत, असे मला वाटते. त्यातला पहिला असा आहे की, या वयात प्रत्येकाला वाटते, आपण जे काही केले आहे, ते आपल्या डोळ्यासमोरच पुढे शाश्वत रहावे. त्यासाठीची व्यवस्था आपण आपल्या डोळ्यासमोर उभी करावी, म्हणजे मग काही चुका होत असतील, काही राहिले असे तर आपल्याला दुरुस्त करता येईल. यासाठीची त्यांची पसंती सुप्रिया सुळे असतील. दुसरा संदेश त्यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे, असे मला वाटते. त्यामध्ये तुम्ही जर काही लबाडी करून, इडी वगैरेची धमकी देऊन अजित पवार यांना फोडून बरोबर घ्याल तर ते एकटेच येतील, तुम्हाला संख्याबळ मिळणार नाही. निवृत्तीचा निर्णय घोषित करून पक्षाला आपल्याभोवती उभे करून पवार यांनी बहुधा हेच केले असावे. - कुमार सप्तर्षी, माजी आमदार व राजकीय अभ्यासक