मुंबई - शरद पवार हे ज्येष्ठ आहेत, पण श्रेष्ठ नाहीत. देवेंद्र फडणवीस हे असे १०-२० पवार खिशात घालून फिरतात, अशी घणाघाती टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली होती. ते मुंबईत भाजपाच्या प्रदेशकार्यालया बाहेर आयोजित चार राज्यांच्या निवडणुकीतील यशाच्या सेलिब्रेशनवेळी बोलत होते. पडळकरांच्या या टीकेनंतर राष्ट्रवादीचे नेते त्यांच्यावर चांगलेच खवळले आहेत. पुण्यातील राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी पडळकरांवर पलटवार केला असून भाजपने असे वाचाळवीर तयार केल्याचं त्यांनी म्हटलं.
'गोपीचंद पडळकरांसारखे वाचाळवीर भाजपने तयार केले आहेत. वैयक्तिक टीका करणे, आत्महत्या झालेल्या महिलांना बदनाम करणे, सरकारला वेठीस धरणे या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात सत्ता मिळविण्यासाठी भाजपचे नेते करत आहेत. त्यातूनच, गोपीचंद पडळकर यांनी हे विधान केले आहे. जीभ उचलायची लावायची टाळ्याला याला काही अर्थच नाही. वास्तविक, या आमदाराकडे ना व्हिजन आहेत, ना पात्रता आहे, तरुणांसाठी काही करण्याचं काम नाही,' असे म्हणत गोपीचंद पडळकर यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी पलटवार केला.
गोपीचंद पडळकर हे भाजपचे आमदार आहेत, त्यांचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच शरद पवार हे माझे गुरू असल्याचं म्हटले होते. पवारांचं बोट धरुन आपण राजकारणात आल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे, फडणवीसांसारखे 200 शरद पवारांच्या हाताखालून ट्रेनिंग घेऊन गेले असतील. म्हणून, बोलतना जरा शब्दरचना ही आमदाराच्या पदाची गरिमा राखणारी असली पाहिजे, असा टोला रुपाली पाटील यांनी पडळकरांना लगावला. तर, देवेंद्र फडणवीस हे नवीन नेतृत्व आहेत, ते पवारांच्या मुलाच्या वयासारखे आहेत. पण, शरद पवार हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत. म्हणूनच, मी गोपीचंद पडळकर यांना सद्बुद्धी देवो, यासाठी बिरोबाकडे साकडं घातलं आहे. राजकारण भलतीकडे घेऊन जाणं, पवार नाव ऐकलं की पडळकरांना झटकेच येत असतील, कारण त्यांचं दर तीन महिन्यातील विधान असं वल्गर असतं. शेवटी शिक्षणाचा अभाव असेल, पण असं करू नये, असे रुपाली ठोंबरे पाटील यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते पडळकर
गोवा विधानसभा निवडणुकीचे प्रभारी असलेल्या देवेंद्र फडणवीसांचं जंगी स्वागत मुंबईत भाजपाकडून करण्यात आलं. यावेळी पडळकरांनी फडणवीसांच्या नेतृत्वाचं कौतुक करताना थेट शरद पवारांवर निशाणा साधला. "शरद पवार हे ज्येष्ठ आहेत. पण श्रेष्ठ नाहीत. काही केलं तरी मीच केलं. माझ्यापेक्षा पुढे कुणी जाता कामा नये असे शरद पवार आहेत. देवेंद्रजी १०-२० पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीसांचं आहे. फक्त विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा आणि राष्ट्राच्या विरोधातील भूमिका शरद पवारांकडे आहे असले विषय सोडून त्यांच्या पुढचं नेतृत्व करण्याची ताकद देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात आहे", असं गोपीचंद पडळकर म्हणाले.