"पवार साहेबांनी अनेकदा केले भाकरी फिरवण्याचे काम, 'त्या' वक्तव्याचा वेगळा अर्थ लावू नका"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 10:28 AM2023-04-29T10:28:05+5:302023-04-29T10:30:02+5:30
पंतप्रधानपदासारख्या किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तींवर टीका करताना संयम बाळगायला हवा, असे मत त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या टीकेवर व्यक्त केले...
पुणे :शरद पवार बरीच वर्षे राजकारणात आहेत, त्यांनी अनेकवेळा भाकरी फिरवण्याचे काम केले आहे. तरुणांच्या मेळाव्यात त्यांनी केलेल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ लावू नका, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले. पंतप्रधानपदासारख्या किंवा कोणत्याही मोठ्या व्यक्तींवर टीका करताना संयम बाळगायला हवा, असे मत त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींबद्दल केलेल्या टीकेवर व्यक्त केले.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सभागृहात पवार यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. ते म्हणाले, विकासकामे किंवा कोणताही प्रकल्प उभा करताना तिथल्या स्थानिक लोकांचा प्राधान्याने विचार करायला हवा. बारसूमधील प्रकल्पाबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याबरोबर मीही बोललो आहे. तिथल्या लोकांचा कोणत्या गोष्टीला विरोध आहे हे त्यांना विचारा, असे मी सामंत यांना सांगितले. तिथे जाण्याचा मी अद्याप विचार केलेला नाही, मात्र वेळ पडली तर जाईल.
नेत्यांवर टीका करताना ती सभ्य भाषेत केली जावी. काहीही बोलणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही. मोठ्या पदांवरच्या व्यक्तीबद्दल टीका करताना शब्दाचा विचार करायला हवा, असे पवार म्हणाले.
बॅनर लावून कोणाला मुख्यमंत्री होता येणार नाही. त्यासाठी १४५ ही मॅजिक फिगर लागते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती युक्तीने मिळविली व ते मुख्यमंत्री झाले. खासदार डॉ. अमोल कोल्हे आमदार जयंत पाटील चांगले मुख्यमंत्री होतील, असे म्हणत असतील तर ते त्यांचे मत आहे.
मी पालकमंत्री असताना कोणतीही बैठक वेळेवर सुरू होत असे. सकाळी ७ वाजताही मी बैठका घेतल्या आहेत. कालवा समितीच्या बैठकीत मला आधी सकाळी १० वाजता सांगितले, नंतर मग ११ व परत १२ वाजता बैठक होईल, असा निरोप आला. मला त्याचदिवशी दुपारी पवारसाहेबांबरोबर बैठक होती, असे अजित पवार यांनी सांगितले.