पिंपरी : जागतिक मराठी अकादमी आणि डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ यांच्यातर्फे शोध मराठी मनाचा हे १८ वे जागतिक मराठी संमेलनाची सुरूवात आजपासून झाली. उद्घाटन सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार शरद पवार यांच्यात शाब्दिक जुगलबंदी रंगली. ‘तालीम’ याविषयावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख न करता ‘मी पार्लमेंटमध्ये जायलाही घाबरतो.’’ असे विधान करून सभागृहात हशा पिकविला.
पिंपरीतील संत तुकारामनगर मधील विद्यापीठ सभागृहातील जागतिक मराठी संमेलनात मात्तबरांची उपस्थिती होती. खासदार शरद पवार, माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार श्रीनिवास पाटील, वात्रटीकाकार यांच्यात शाब्दिक जुगलबंदी अनुभवयास मिळाली. शाब्दिक कोट्यामुळे हास्यकल्लोळ अनुभवयास मिळाला.
शरद पवार यांच्या अगोदर सुशीलकुमार शिंदे यांचे भाषण झाले. शिंदे म्हणाले, ‘‘मराठी संमेलन खूपच चांगले आहे. शरद पवार कधी कोणत्या प्रकारची स्कीम काढतील सांगता येत नाही. त्यांचे मराठी माणसांवर प्रेम आहे. तो कोणत्याही जातीचा असला तरी, त्याला ते मदत करतात. माझ्यापेक्षा साडेआठ महिन्यांनी ते वयाने मोठे आहेत. तरीही ते एवढे फिरतात, कार्यक्रमांना हजेरी लावतात. ताठ मानेने उभा राहणारा महाराष्ट्राचा नेता रात्रदिवस काम करत आहे. मी त्यांच्याच तालमीत तयार झालो आहे.’’
भाषण झाल्यानंतर अन्य कार्यक्रमासाठी पवार यांना सांगून शिंदे निघून गेले. त्यानंतर पवार यांनी आपल्या मनोगतात ‘तालिम’ या शब्दावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टोला लगाविला. पवार म्हणाले, ‘‘आताच सुशिलकुमार एका कार्यक्रमासाठी येथून बाहेर पडले. त्यावेळी मी त्यांना म्हणालो, मी तुमच्याविषयी बोलणार आहे. पण, चिंता करू नका, असे म्हटले. ’
पवार पुढे म्हणाले, ‘‘मी यांच्या तालमीत शिकलो आहे, असे सुशीलकुमार म्हटल्याने मला खूप भिती वाटली. कारण, कोणी तरी सांगितले की मी शरद पवारांचे बोट धरुन राजकारणात आलो. तेव्हापासून मी पार्लमेंटमध्ये जायलाही घाबरतो. मला पार्लमेंटमध्ये जाण्याची भीती वाटते.’’ यावर नाट्यगृहात हशा पिकला.