पुणे : राज्यात दसरा मेळाव्याहून जे सुरू आहे ते दुर्दैवी आहे. शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. पण त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण बिघडणार नाही, याची खबरदारी प्रमुख नेत्यांनी घ्यायला हवी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिली. ते म्हणाले, आता दसरा मेळाव्याला ज्या भूमिका मांडतील त्याने कटुता वाढणार नाही याकडेही लक्ष दिले पाहिजे. गणेशकला क्रिडामंच सभागृहातील एका क्रार्यक्रमानंतर शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
यावेळी पवार म्हणाले, २०१४ ला शिवसेनेसोबतच्या सरकारचा कुठलाही प्रस्ताव असता तर मला समजलं असतं. अशोक चव्हाण काही बोलल्याचं मला तरी माहिती नाही. दसरा मेळावा हा शिवसेनेचा आहे, तो वेगळा पक्ष आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस काही करणार नाही, अशी प्रतिक्रिया पवार यांना दसरा मेळाव्यावरील प्रश्नावर दिली.
अंधेरी पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवाराला राष्ट्रवादी पाठिंबा देणार आहे, असंही पवार यावेळी म्हणाले. आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मुंबईतील अंधेरी पूर्व या विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी पहिली परीक्षा मानली जात आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी आहे त्यावर राष्ट्रवादीची भूमिका काय यावर उत्तर देताना पवार म्हणाले, आम्ही कधीही अशी मागणी केलेली नाही.