पुणे : देशात अनेक राजे होऊन गेले, पण त्यांचे राज्य त्यांच्या घराण्याच्या नावाने चालले. याला एकच अपवाद म्हणजे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज होते. त्यांनी जातीपातीच्या पलीकडे भेदभाव न करता रयतेचे राज्य केले. त्यांनी कधी भोसल्यांचे राज्य केले नाही, तर त्यांनी उभे केले ते हिंदवी स्वराज्य, रयतेचं राज्य. छत्रपतींचा हाच आदर्श घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने लाल महालात शिवराज्याभिषेक सोहळा पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराज वैदिक विद्यालयातील कैलास वडघुले यांनी राज्याभिषेक विधी पार पाडले. शस्त्रपूजन, फळे, धान्य यांचे पूजन, छत्रपती शिवरायांच्या नित्य वापरातील कवड्याच्या माळेचे पूजन, राजमुद्रेचे पूजन करण्यात आले.