पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचे नेते,खासदार संजय राऊत घेणार असलेली मुलाखत सध्या तरी रद्द करण्यात आली आहे. यासंबंधीची माहिती साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानने कळवली आहे. राज्यात होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारामुळे ही मुलाखत पुढे ढकलण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येत्या २९ रविवारी (दि. २९) रोजी राऊत हे पवार यांची मुलखात घेणार होते. त्यामुळे पुणेकरांसह राजकीय विश्वालाही या मुलाखतीची प्रतीक्षा होती. भाजपाला बाजूला ठेवत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबत आघाडी करून सरकार स्थापन केले. त्यावेळी पवार यांच्यासोबत शिवसेनेतर्फे राऊत यांचीही भूमिका महत्वाची ठरली होती. त्यामुळे सत्तास्थापनेची अनेक गुपिते या मुलाखतीतून उलगडण्याचा शक्यता मानली जात होती.
यापूर्वी पुण्यातच राज ठाकरे यांनी पवार यांची मुलाखत घेतली होती. ती मुलाखत सोशल मीडिया आणि राजकीय विश्वात गाजली होती. त्यामुळे आता पुढच्या महामुलाखतीची प्रतीक्षा होती. मात्र आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामुळे ही नियोजित मुलखात पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र १९'वे साहित्यिक कलावंत संमेलन हे २८ आणि २९ डिसेंबर याच काळात पार पडणार असून फक्त मुलाखतीचे आयोजन नंतर करण्यात येईल असे, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिलीप बराटे आणि सचिव वि.दा. पिंगळे यांनी कळविले आहे.