पुणे/मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सध्या राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. सध्या राज्यात जे चाललंय ते महाराष्ट्राच्या राजकीय सस्कृतीला न शोभणारं आहे. सरकार गेल्यानं काही जण अस्वस्थ आहेत, सगळेच माझ्यासारखे नसतात. सत्ता गेल्यानं वाईट वाटणं स्वाभाविक आहे. पण, सत्ता येत जात असते. सत्ता गेल्यानं इतकं अस्वस्थ होण्याचं कारण नाही, असे म्हणत शरद पवारांनी भाजपला टोला लगावला. तसेच, राष्ट्रपती राजवट आणि समान नागरी कायद्यावरही पवार यांनी भाष्य केलं.
राज्यातील कायदा, सुव्यवस्था बिघडली असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. राष्ट्रपती राजवटीची भाषा केली जात आहे. त्यावर पवारांनी भाष्य केलं. तर, देशात समान नागरी कायदा आणण्याच्या हालचाली सुरू आहेत, यासंदर्भातील प्रश्नावरही त्यांनी स्पष्ट शब्दात मत मांडलं. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
समान नागरी कायद्यासंदर्भात बोलता शरद पवार म्हणाले की, संसदेत जेव्हा तो कायदा चर्चेला येईल, तेव्हा चर्चा करू आज नाही. पण, हा निर्मण घेणार असतील तर राज्यसभा आणि लोकसभेत चर्चेला यावं लागेल. कदाचित, कदाचित संसदेत जी पद्धत आहे. त्यानुसार, असे महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी विरोधकांशीसुद्धा सुसंवाद करायचा, तसं केल्यास ती एक संधी आहे. त्यावेळी, समान नागरी कायद्यासंदर्भात आम्ही आमची मतं व्यक्त करू, असे पवार यांनी सांगितले.
राज्यातील सध्याच्या राजकारणावर मांडलं मत
अलिकडच्या काळात व्यक्तीगत टिकांच्या माध्यमातून वातावरण बिघडत आहे. राज्याच्या राजकारणात मी आणि बाळासाहेब ठाकरेंनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला. एकदा औरंगाबादेत एकदा आम्हा दोघांचीही सभा झाली होती. या सभेत आम्ही एकमेकांवर तुटून पडलो. मात्र, बापूसाहेब काळदाते आणि अनंता भालेराव यांच्यासमवेत आम्ही रात्री एकत्र बसून गप्पा मारायचो. दुपारच्या सभेचा उल्लेखही त्या बैठकीत होत नसत. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ही परंपरा चालत आहे. अनेकदा विधानसभेतही आम्ही सत्ताधारी विरोधक म्हणून भांडलो. पण, संध्याकाळी एकत्र बसून राज्याच्या हितासंदर्भात चर्चा करत, अशा आठवणीही शरद पवारांनी सांगितल्या. राष्ट्रपती राजवटीच्या चर्चा होत आहेत, पण तसं काही घडत नाही. निवडणुका घेण्याचा विचार असेल तर कोल्हापूरच्या निवडणूक निकालाने तेही दाखवून दिलंय. त्यामुळे, निवडणुका घेण्यात येतील, असेही मला वाटत नाही, असे पवारांनी स्पष्टच सांगितले.
जुन्या परिस्थितीवर पूर्ववत येण्याची काळजी घेऊ
मुख्यंत्र्यांवर धोरणात्मक टिका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण, त्यांचा एकेरी उल्लेख करुन वेडवाकडं बोलणं शोभत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणून मी बघत नाही, ती एक संस्था आहे. या संस्थेचा सन्मान ठेवायला हवा, पण या संस्थेचा मान न ठेवण्याची भूमिका काही लोक घेतात. राज्यातील ही परिस्थिती काही दिवसांत खाली जाईल, अशी अपेक्षा करुयात. महाराष्ट्र राज्याची जुनी परंपरा जशी आहे, त्यावर पूर्ववत येण्याची काळजी घेण्यासाठी आपली जबाबदारी आहे, आम्ही ते करुयात, असे शरद पवार यांनी म्हटलं. आमच्या स्नेह्यांनाही यातून काहीतरी समजेल आणि योग्य वातावरण निर्माण करायला तेही प्रयत्नशील राहतील अशी अपेक्षा करूयात, असेही पवार यांनी म्हटले.
सत्ता गेल्याने लोकं अस्वस्थ होतात
सत्ता गेल्यानं अस्वस्थ होण्याचं कारण नाही. मी अनेकदा सत्ता गमावली आहे. मात्र, त्यामुळे कधीही अस्वस्थ झालो नाही. १९८० मध्ये पुलोद सरकार बरखास्त झाल्याची आठवण त्यांनी सांगितली. १९७८ मध्ये राज्यात पुलोदचं सरकार होतं. १९८० मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या शिफारशीनंतर पुलोद सरकार बरखास्त करण्यात आलं. मात्र, मी अस्वस्थ झालो नाही. सरकार बरखास्त करण्यात आल्याची माहिती मला मुख्य सचिवांकडून समजली. त्यानंतर मी माझ्या काही मित्रांना निवासस्थानी बोलवून घेतलं. सामानाची आवराआवर, बांधाबांध केली आणि सकाळी दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलो. तेव्हा वानखेडेवर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना सुरू होता. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान सोडल्यावर मी कसोटी सामना पाहायला मैदानावर गेलो होतो, असा किस्सा पवारांनी सांगितलं.