पुणे : कोट्यवधी रुपयांचा खर्चाचे जम्बो रुग्णालय उभारल्यानंतरही आरोग्य व्यवस्था का सुधारत नाही, असा थेट सवाल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विभागीय आयुक्त सौरभ राव आणि आयुक्त विक्रम कुमार यांना केला. अधिका-यांनी उपाययोजनांसंबंधी दिलेल्या माहितीवरुनही त्यांनी नाराजी व्यक्त करत अधिका-यांना झापत व्यवस्था सुधारण्याच्या सक्त सूचना केल्या.
शरद पवार मागील दोन दिवसांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील कोरोनाचा आढावा घेत आहेत. गुरुवारी त्यांनी पिंपरी चिंचवडमधील परिस्थितीचा आढावा घेतला. शुक्रवारी त्यांनी विभागीय आयुक्त आणि पालिका आयुक्तांसोबत बैठक घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांसोबत बैठक घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पवारांनी शुक्रवारी अधिका-यांची बैठक घेत उपाययोजना, यंत्रणांमधील समन्वय आदींचा आढावा घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या जम्बो रुग्णालयामुळे समस्या सुटण्याऐवजी अधिकच बिकट झाल्याचे पहायला मिळते आहे. रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळत नसल्याने आठवड्याभरात 30 पेक्षा अधिक मृत्यू झाले आहेत. पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या उपचारा अभावी झालेल्या मृत्यूप्रकरणीही पवार यांनी अधिका-यांची चांगलीच कानउघडणी केली. जम्बो रुग्णालयाचा नागरिकांना लाभ होतो आहे काय, कोरोना आटोक्यात आणण्याकरिता काय उपाययोजना करता आहात असे प्रश्न पवार यांनी अधिका-यांना केले. दरम्यान, पवार शनिवारी महत्वपूर्ण बैठक घेणार असून या बैठकीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पुणे महापलिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित राहणार आहेत. =====अजित पवारांनंतर स्वत: साहेब मैदानातउपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार दर आठवड्याला पुण्यात बैठक घेत कोरोनाचा आढावा घेतात. तसेच अधिका-यांना आवश्यक त्या सूचना करतात. जम्बो रुग्णालयाच्या उभारणीच्या कामाचीही त्यांनी प्रत्यक्ष जाऊन अनेकदा पाहणीही केली होती. कोरोना आटोक्यात आणण्याबाबत अधिका-यांना त्यांनी त्यांच्या खास शैलीमध्ये सूचना देऊनही फारसा फरक पडलेला दिसत नाही. आता खुद्द शरद पवारच मैदानात उतरले आहेत.