किरण शिंदे
Supriya Sule criticizes Sunil Tingre : पोर्शे कार अपघातानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे चर्चेत आले आहेत. मद्यधुंद अवस्थेत पोर्शे कार चालवत दोघांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन कारचालकाला वाचविण्याचा प्रयत्न टिंगरे यांनी केल्याचा आरोप करण्यात आला होता. इतकेच नाही तर अल्पवयीन कारचालकाच्या रक्ताची अदलाबदल करण्यासाठी सुनील टिंगरे यांनी ससून रुग्णालयातील डॉक्टरांना फोन केल्याचा आरोपही करण्यात आला होता. याप्रकरणी पुणे पोलिसांनी सुनील टिंगरे यांची चौकशीही केली. याच प्रकरणावरून काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टिंगरे यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील बोरसे अपघात प्रकरणावरून सुनील टिंगरे यांच्यावर जोरदार निशाणा साधत काही प्रश्न उपस्थित केले. सुप्रिया सुळे पुण्यातील लोहगाव मध्ये बोलत होत्या.
"वडगाव शेरीवाल्यांनी तर काही बोलूच नये. कुठल्या तोंडाने ते आता मतं मागणार आहेत. त्यांच्या दोन्ही हातावर रक्त आहे. माझा त्यांच्यावर हा गंभीर आरोप आहे. ज्या दोन लोकांचा यात जीव गेला त्यांच्या आई-वडिलांचा कधी विचार केला का? त्यांच्या आई-वडिलांना, कुटुंबांना काय वाटत असेल याचा कधी विचार केलाय का? ज्यांच्याकडे पैसे आहेत, पोर्शे गाडी आहे म्हणून तुम्ही त्यांची बाजू घेताय? हे चालणार नाही. मी स्वतः त्यांचे विरोधात प्रचार करून जंग पछाडणार. या अपघातात ज्यांचा मृत्यू झालाय त्यांच्या आईला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची आई-वडील मध्यप्रदेशात राहतात. त्यांचे अश्रू पुसण्यासाठी तुम्ही जाणार आहात? तुम्ही बिर्याणी आणि पिझ्झा घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाता, हे पोलीस स्टेशन आहे तुमच्या घरातला डायनिंग टेबल नाही. ही मस्ती तुमच्या घरी दाखवायची. सर्वसामान्यांच्या अश्रू समोर तुमची मस्ती नाही चालणार. कोट्यावधी रुपयांची पोर्शे गाडी आहे. कुठल्या पैशाने घेतली देवाला ठाऊक. मात्र याच गाडीने दोघांचा जीव घेतला. या दोघांची काय चूक होती? ते गरीब होते ही चूक होती की दुचाकीने जात होते ही चूक होती? गरिबांच्या आयुष्याची ही किंमत कराल आणि पोर्शेवाल्याला बिर्याणी खायला घालाल. हे चालणार नाही. अशी प्रवृत्ती असणाऱ्यांना यावेळेस घरी पाठवण्याची जबाबदारी वडगाव शेरीकरांवर असणार आहे," असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
"कुठल्या तोंडाने तुम्ही मत मागणार आहात. माझा आरोप आहे तुम्ही भ्रष्टाचारी आहात, तुम्ही खुनी आहात. हे इतकं करून थांबले नाहीत तर रक्त तपासणीमध्ये रक्त बदलण्याचं पाप यांनी केले आहे. असा लोकप्रतिनिधी तुम्हाला पाहिजे. महाराष्ट्र प्रश्न विचारतोय, मला उत्तर पाहिजे, त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये फोन कोणी केले? रक्त तपासणी करत असताना ससून हॉस्पिटलमध्ये फोन कोणी केला? त्या आईसाठी मी प्रश्न विचारत आहे. माझी लढाई वैयक्तिक नाही. त्यांच्या पैशाच्या मस्ती मुळेच घरातील दोन कर्ते गेले आहेत. ती पोर्शे गाडी तिथे गेली नसती तर आज त्यांचं घर हस्त खेळत राहिलं असतं. ही लोक गुन्हेगार आहेत," असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.