- प्रशांत ननवरे
बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवारांना पैलवान म्हणूनही ओळखले जाते. याच पैलवानाने पक्ष फुटला, नवे चिन्ह मिळाले तरी लोकसभेचे मैदान मारून दाखवले. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील आगामी राजकारणाची दिशाच बदलून गेली आहे. बारामती आपलीच असल्याचे दाखवून तर दिलेच पण सुप्रिया सुळेंच्या विजयामुळे नव्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले. नवे नेतृत्व उदयास येऊ लागले आहे. आगामी निवडणुकांमध्ये आता पुन्हा एकदा शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संषर्घ पाहायला मिळणार आहे.
बारामती शहरातील सहकारी संस्था, दूध संघ, सहकारी बॅंक, सहकारी कारखान्यांवर उपमुख्यमंंत्री अजित पवार यांचे वर्चस्व आहे. या सर्व संस्था बारामतीच्या अर्थकारणाशी संबंधित आहेत. त्यानंतरही अजित पवार हे त्यांच्या पत्नी आणि महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा पराभव रोखू शकले नाहीत. त्यामुळे आजचा निकाल अजित पवारांच्या चिंतेत भर घालणारा आहे. तुलनेने प्रचंड मातब्बर प्रचार यंत्रणा असतानादेखील झालेला पराभव अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे. पक्ष आणि पवार कुटुंबियांच्या फुटीनंतर बारामतीत शरद पवार यांनी पक्ष चिन्ह, पक्ष कार्यालयापासून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची नव्याने बांधणी केली. पक्षाच्या अनेकांनी प्रथमच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभाग घेतला. मात्र, या नवख्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा प्रचार तुलनेने उजवा ठरला. सुप्रिया सुळे यांच्या विजयाने या नवख्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. त्यामुळे आगामी प्रत्येक निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष पाहायला मिळणार आहे. बारामतीच्या विधानसभेपासून स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्था, नगर परिषदेसह सर्वच निवडणुकांत आता पवार कुटुंबीय एकमेकांसमाेर शड्डू ठोकताना दिसतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनेकांना संस्थांची मोठी पदे देत राजकीय बळ दिले आहे. मात्र, हे पदाधिकारी लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी अपेक्षित कामगिरी करू शकलेले नाहीत. आज बारामतीत सुप्रिया सुळे यांना मिळालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून संबंधित पदाधिकाऱ्यांची निष्क्रीयता उघड झाली आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यांना अजित पवार यांच्यापासून तोंड लपविण्याची वेळ आली आहे.
इंदापूरला आप्पासाहेब जगदाळेंना संधी?
इंदापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील बरोबर असूनही सुनेत्रा पवार यांच्या वाट्याला पराभव आला. त्यामुळे लोकसभेत राखलेला राजकीय एकोपा आगामी काळात राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शरद पवार गट या भागात सक्रिय झाल्याने राजकारण वेगळ्या वळणावर आले आहे. आमदार भरणे किंवा हर्षवर्धन पाटील यांच्यापैकी कोणाला उमेदवारी मिळणार? हा प्रश्न सध्या अनुत्तरीतच आहे. दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळाल्यास दुसरा उमेदवार शरद पवार गटाच्या वाटेवर जाणार का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सध्या इंदापूरमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून आप्पासाहेब जगदाळे यांच्याकडे पाहिले जाते. मात्र, महायुतीचा चेहरा कोणता? याची आत्तापासूनच चर्चा रंगली आहे.
भोर आणि पुरंदरमध्ये आघाडी धर्म तर महायुतीत उमेदवारीचा गोंधळ
जिल्ह्यातील पुरंदर आणि भोर विधानसभा मतदारसंघ काॅंग्रेसकडे आहे. आमदार संजय जगताप आणि आमदार संग्राम थोपटे हे दोघेही पक्षाच्या सूचनेनुसार आघाडी धर्माचे पालन करत पहिल्या दिवसापासून सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात सक्रिय झाले होते. विजयासाठी या दोन्ही नेत्यांनी जीवाचे रान केले होते. त्यामुळे आगामी निवडणुकीत शरद पवारांची पूर्ण ताकद या दोन्ही आमदारांच्या पाठीशी राहणार, हे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे पुरंदरमधून शिंदेसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे विधानसभेसाठी इच्छुक आहेत. मात्र, या निवडणुकीत त्यांचा करिष्मा चालला नाही. त्यामुळे त्यांची गोची झाली आहे. याशिवाय अजित पवार गटाकडेही सक्षम असा उमेदवार या मतदारसंघात नाही.
जे भाजपमध्ये सामील झाले त्या जालिंदर कामठेंसह अन्य जण पूर्वीची राष्ट्रवादीची नेतेमंडळी आहेत. तेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. एकूणच महायुतीत इच्छुकांचा गोंधळ वाढला आहे. पराभवामुळे शिवतारे यांना दिलेला शब्द अजित पवार गटाचे कार्यकर्ते पाळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर भोरमध्येही अजित पवार गटाचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे विधानसभेसाठी इच्छुक आहेत तसेच शिंदेसेनेचे कुलदीप तात्या कोंडे, भाजपचे किरण दगडे-पाटील हे देखील इच्छुक असून, येथे ही गोंधळाची स्थिती आहे.
दौंडकरांना मिळाला तिसरा पर्याय
दाैंडमध्ये आमदार राहुल कुल आणि जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष रमेश थोरात यांच्याभोवतीच विधानसभेचे राजकारण फिरते. या दोघांपैकी कोणाला महायुतीची उमेदवारी मिळणार? यावर गणिते अवलंबून आहेत. उमेदवारी देताना महायुती कोणता निकष लावणार, यावर विधानसभेचे राजकारण ठरणार आहे. कुल-थाेरात गटाच्या राजकारणाला दौंडकर वैतागले आहेत. राेजगाराचा मोठा प्रश्न तालुक्यात आहे. त्यावर कोणतीही उपाययोजना होत नाही. लोकसभेच्या निकालानंतर नव्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शरद पवार गटातर्फे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी खूप परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत त्यांना संधी मिळण्याची शक्यता असून, महायुतीचे भिजत घोंगडे कायम राहील.