इंदापूर : देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार राजकीय , सामाजिक, क्रीडासह कोणत्याच क्षेत्रात मागे नाहीत याची प्रचिती इंदापूरमध्ये आली. इंदापूर बाजार समितीमध्ये शरद कृषी महोत्सवातील 'खेळ पैठणीचा' या महिलांसाठीच्या कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी पवारांनी उपस्थित प्रेक्षकांना आश्चर्याचा धक्काच दिला. या कार्यक्रमात ‘नावाची काय बिशाद, प्रतिभा माझ्या खिशात’ या उखाण्याने उपस्थितांमध्ये हास्याचे कारंजे उडवले. तसेचहा उखाणा प्रेक्षकांची भरभरुन टाळ्यांच्या गजरातली दादही मिळवून गेला.
इंदापूर येथील कृषी प्रदर्शनात खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम होता. त्यामध्ये डोळ्यावर पट्टी बांधून टिकली लावणे, उखाणा घेणे असे विविध कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करण्यात आले होते. समारोपाच्या प्रसंगी स्टेजवर भाषण करत असताना, साहेबांनी निवेदिककेला विचारले, हा खेळ पैठणीचा काय कार्यक्रम आहे ? त्यावर निवेदिकेने सांगितलं. साहेब जे महिला या स्पर्धांमध्ये चांगला उखाणा घेतील त्यांना, पैठणी मिळणार असल्याचे सांगितले, त्यावर शरद पवार यांनी म्हंटले, मला वाटलं आमच्यासमोरच कोणीतरी एखादा उखाणा घेणार, त्यावर निवेदिकेने उखाणा घ्यायला सुरवात केली. ' नाव घ्यायला सांगाल तर, घ्यावी लागेल साडी, नाव घ्या म्हणत असाल तर घ्यावी लागले साडी... त्यावर पटकन नाव घ्या हो.. असं म्हणत पवारांनी या निवेदिकेला उखाणा पूर्णही करायला लावला. त्यानंतर शरद पवार यांनी व्यासपीठावर उपस्थित नेत्यांना उखाणा घेताय का..! अशी विचारणा केली व स्वत:च उखाणा घेतला व उपस्थितांमध्ये हास्याचे फवारे उडाले...
पवार साहेबांनी थोडक्यात उखाणा घ्यायचा असतो असे म्हणत, नावाची काय बिशाद, प्रतिभा माज्या खिशात असं हातवारे करत उखाणा घेतला. तेव्हा लगेच पवारांची मुलगी खासदार सुप्रिया सुळे यांनी माईक हातात घेत, म्हणाल्या, संध्याकाळी बाबांना घरी आईकडून नो एंट्री होईल.... हे रेकॉर्ड करु नका... आईने पाहिले तर, बाबांना घराबाहेरच झोपावं लागेल... त्यावर उपस्थितांमध्ये पुन्हा हास्याचे फवारे उडाले.. आणि इंदापूर शरद कृषी महोत्सव २०१९ चे समारोप आनंदाच्या वातावरणात पार पडले....