शिरूर: केंद्र व राज्य शासनाने सर्व साखर कारखान्यांना सुरू करण्यासाठी मदत केली. परंतु, एकमेव शिरूरच्या घोडगंगा साखर करखान्याला मदत केली नाही. हे सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे. परंतु, या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचेच सरकार स्थापन होणार आहे. यानंतर घोडगंगा साखर कारखाना कसा सुरू होत नाही, तेच मी पाहतो, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केले.
बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शरदचंद्र पवार यांच्या गोविंद बागमधील निवासस्थानी महाविकास आघाडीचे शिरूर हवेलीचे उमेदवार आमदार अशोक पवार यांनी पदाधिकाऱ्यांसाह भेट घेत पावर यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर शिरूर हवेलीतील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, सत्ता आपल्या हातात ठेवण्यासाठी पक्षांच्या फोडाफोडीचे राजकारण महाराष्ट्रात झाले. यात आमचा पक्ष, चिन्ह आणि सर्व हिसकावण्याचा प्रयत्न झाला. या सर्व उलथापालथीत जे मोजके लोक माझ्यासोबत भक्कमपणे राहिले, त्यात आमदार अशोक पवार हे एक आहेत. खूप निर्धारपूर्वक, अनेक दबावाला तोंड देत ते निष्ठेने उभे आहेत. यामुळेच घोडगंगा बंद ठेवण्याचे चुकीचे काम शासनाने केले आहे. हा कारखाना शेतकऱ्यांची जीवन वाहिनी आहे. याचाही विसर पडला आहे. विरोधात असूनही अशोक पवारांच्या विकासकामांच्या जोरावर तालुका आज प्रगतीपथावर आहे.
सध्या विरोधकांकडे आरोपांसाठी फक्त घोडगंगा बंद, हेच एकमेव हत्यार आहे. मात्र, राज्यात सरकार बदलणार आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे. त्यामुळे कारखान्याची कसलीच काळजी करू नका, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
इतिहासाची पुनरावृत्ती होणार
सन १९८०मध्ये माझ्या नेतृत्त्वात ५८ आमदार निवडून आले होते. मी विरोधी पक्षनेता होतो. यानंतर ५२ आमदार फुटून गेले होते, मी ६ आमदारांचा नेता राहिलो. परंतु, यानंतर झालेल्या निवडणुकीत फुटलेल्या सर्व आमदारांना मतदारांनी नाकारले. हा इतिहास आहे. आता याची पुनरावृत्ती झाल्याशिवाय राहणार नाही, असे शरद पवार यावेळी म्हणाले.