बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘गोविंदबाग’ निवासस्थानासमोर मंगळवारी आंदोलन करण्याचा इशारा एस टी कर्मचारी संघटनेच्या वतीने देण्यात आला होता. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘गोविंदबागे’समोर येत प्रतिआंदोलनाची भुमिका घेत जोरदार घोषणाबाजी केली. पोलीस प्रशासनाने यावेळी यशस्वी मध्यस्थी केल्याने राष्ट्रवादीने प्रतिआंदोलन स्थगित केले.
थेट पवार यांच्या बारामती येथील निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा एस टी कर्मचारी संघटनेने इशारा दिल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘महाराष्ट्राचा बुलंद अवाज, शरद पवार - शरद पवार,पवारसाहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है, आदी घोषणांनी परीसर दणाणुन सोडला.
यावेळी अतिरीक्त पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माळेगांव कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, माळेगांवचे संचालक योगेश जगताप आदींशी संवाद साधला. तसेच गोविंद बागे च्या सुरक्षेची संपुर्ण जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा मान राखण्यासाठी हे प्रतिआंदोलन स्थगित करण्याचे आवाहन मोहिते यांनी केले. त्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रतिसाद देत प्रतिआंदोलन स्थगित केले.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, माळेगांव कारखान्याचे संचालक योगेश जगताप, केशव जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, सुभाष ढोले, महिला अध्यक्षा वनिता बनकर, संध्या बोबडे आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी साध्या कपड्यातील ‘वॉचर’
एसटी कर्मचारी संघटना आंदोलन इशाऱ्याच्या पार्श्वभुमीवर बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी देखील कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच संपुर्ण शहरात गस्त नेमण्यात आली आहे. साध्या कपड्यात ‘वॉचर’ नेमल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली.