बारामती : उत्तरप्रदेशात शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्यात आले. त्याची तुलना मी जालियनवाला बाग हत्याकांडाशी केली. त्याचा संताप किंवा राग सत्ताधाऱ्यांना आला असावा, आजची कारवाई ही त्यावरील प्रतिक्रिया असावी, अशी शक्यता नाकारता येत नाही,अशा शब्दात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी आयकर विभागाने केलेल्या छापेमारीबाबत नाराजी व्यक्त केली.
बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांसह, साखर कारखान्यांवर आयकर विभागाने छापे टाकले. या छापेमारीवरुन पवार यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला.
पवार म्हणाले, एखाद्या विषयासंबंधी शंका आल्यास त्याची चौकशी करण्याचा अधिकार यंत्रणांना आहे. परंतु अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी छापे टाकणे हा अधिकाराचा अतिरेक आहे. अधिकाराचा असा गैरवापर किती दिवस सहन करायचा याचा आता लोकांनीच विचार करावा,असे पवार म्हणाले.
''साक्षीदार हे एखादी घटना पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी, त्यासंबंधी न्यायालयात साक्ष देण्यासाठी बोलावले जातात. कारवाई वेळी पकडणे हे साक्षीदारांचे काम नव्हे. मुंबई ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना घेवून जाणारे लोक शासकिय यंत्रणेचे नव्हते. नंतर खुलासा करण्यात आला की ते साक्षीदार म्हणून बोलावण्यात आले होते. याचा अर्थ या कारवाईत काही पक्षीय लोकांना सामावून घेण्यात आले होते. ड्रग्ज प्रकरणी कारवाई झालीच पाहिजे. परंतु ती या पद्धतीने नको, असे मत पवार यांनी व्यक्त केले.''
किरीट सोमय्या यांना टोला
''काही लोक भाषणे करून अथवा पत्रकार परिषदा घेवून आरोप करतात. ते बोलल्यानंतर केंद्रीय एजन्सीज कारवाई करण्यासाठी पुढे येतात ही आक्षेपार्ह बाब असल्याचा टोला ज्येष्ठ नेते पवार यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना लगावला.''
दरम्यान, महाविकास आघाडीला चांगला प्रतिसाद मिळेल स्थानिक स्वराज्य संस्थांसह काही पोटनिवडणूकांमध्ये महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तिन्ही पक्ष एकत्रित लढले तर शंभर टक्के निकाल त्यांच्या बाजूने जाईल असाहि अंदाज पवार यांनी व्यक्त केला.